आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामद्यपानासोबत व्हायग्रा या सेक्स पॉवर वाढवणाऱ्या गोळ्यांचे सेवन केल्यामुळे नागपुरात ४१ वर्षीय व्यक्तीला प्राण गमवावे लागल्याची घटना काही महिन्यांपूर्वी समोर आली होती. गुंतागुंतीच्या या मृत्यू प्रकरणाची उकल आता वैद्यकीय अभ्यासकांनी केली आहे. मद्यपानासह व्हायग्राच्या दोन गोळ्या घेतल्यामुळे हा मृत्यू झाल्याचा निष्कर्ष शोध निबंधात प्रकाशित केला आहे. मेंदूत रक्तस्राव झाल्यामुळे मद्यपानासोबत व्हायग्रा सेवन केल्याच्या दुसऱ्या दिवशी तरुणाचा मृत्यू झाला होता, असा दावा दिल्लीच्या //"एम्स''मधील सहा संशोधकांनी प्रसिद्ध केलेल्या केस रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. सप्टेंबर २०२२ मध्ये सादर केलेल्या त्यांच्या प्रबंधात संबंधित पुरुषाला सेरेब्रोव्हॅस्क्युलर हॅम्रेज झाला असल्याचे म्हटले आहे. //"जर्नल ऑफ फॉरेन्सिक अँड लिगल मेडिसिन''च्या मार्च आवृत्तीत हा अहवाल प्रसिद्ध झाला आहे.
संशोधकांच्या अभ्यासानुसार, ४१ वर्षीय पुरुषाला कोणतीही मेडिकल आणि सर्जिकल हिस्ट्री नव्हती. तो एका मैत्रिणीसोबत नागपुरातील लॉजच्या खोलीत राहत होता. त्याने रात्री सिल्डेनाफिल (प्रत्येकी ५० मिग्रॅ) २ गोळ्या आणि अल्कोहोल घेतले. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर त्याला अस्वस्थ वाटायला लागल्यावर मैत्रीण घाबरली. त्याला उलट्याही होत होत्या. त्याच्या मैत्रिणीने वैद्यकीय मदत घेण्याचा आग्रह धरला. मात्र यापूर्वीही अशी लक्षणे आपण अनुभवली होती, असे सांगून त्याने तिला काळजी न करण्यास सांगितले. त्याची अस्वस्थता वाढल्या नंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. ऑटोप्सी किंवा शवविच्छेदन अहवालात डॉक्टरांना उजव्या बेसल गॅंग्लियामध्ये सुमारे ३०० ग्रॅम रक्त गोठलेले आढळले. सूक्ष्म तपासणीत आढळलेले इतर महत्त्वपूर्ण निष्कर्ष म्हणजे त्याच्या यकृतातील फॅट्समध्ये झालेला रचनात्मक बदल होता.
लाेकांना जागरुक करणयासाठी संभाव्य प्राणघातक औषधे वैद्यकीय सल्ल्याशिवाय घेण्याच्या जोखमींबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी ही दुर्मिळ केस प्रकाशित केल्याचे संशोधकांनी सांगितले. मृताकडे औषधाचे प्रिस्क्रिप्शन नव्हते. औषधाच्या साइड इफेक्ट्समध्ये डोकेदुखी, वारंवार पोट खराब होणे, रक्तदाब समस्या आणि अनुनासिक रक्तसंचय यांचा समावेश होतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.