आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूर:महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी चंद्रपूर दारूबंदी हटविण्याचा निर्णय मागे घ्यावा, दारूबंदी समर्थक कार्यकर्त्यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पालकमंत्रीच दारूविक्रेत्यांच्या बाजूचे असल्याने दारूबंदीला बदनाम केले गेले, निर्णय मागे न घेतल्यास आंदोलनाचा इशारा

दारू पिण्याचे व इतर व्यसन करण्याचे वय दिवसेंदिवस कमी होते आहे. हे महाराष्ट्राच्या एकूणच भवितव्यासाठी अत्यंत चिंताजनक आहे. तेव्हा या विषयाकडे राजकारण आणि अर्थकारणाच्या पलीकडे जात कठोर भूमिका घ्यावी व चंद्रपूर दारूबंदी हटविण्याचा निर्णय मागे घ्यावा, अशी कळकळीची विनंती करणारे पत्र राज्यातील दारूबंदी समर्थक कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहीले आहे. चंद्रपुरच्या पालकमंत्र्यांनी प्रतिष्ठेचा प्रश्न करून सरकारवर दडपण आणून सरकारला हा निर्णय घ्यायला भाग पाडले असा आरोप कार्यकर्त्यांनी पत्रातून केला आहे.

महाराष्ट्रातील व्यसनमुक्ती चळवळीत काम करणारे सर्व कार्यकर्ते या निर्णयामुळे अत्यंत निराश झाले आहे. हा निर्णय न बदलल्यास महाराष्ट्रातील व्यसनमुक्ती चळवळीतील सर्व कार्यकर्ते आंदोलनाची भूमिका घेतील, असा इशाराही या कार्यकर्त्यांनी दिला आहे. यामध्ये राज्यातील हेरंब कुलकर्णी, वसुधा सरदार, अॅड. पारोमिता गोस्वामी, अविनाश पाटील, वर्षा विद्या विलास, महेश पवार, तृप्ती देसाई, विजय सिद्धेवार, रंजना गवांदे, डॉ्. अजित मगदुम, प्रेमलता सोनूने, अड. सुरेश माने, तुलसीदास भोईटे व अमोल मडामे आदींचा समावेश आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने नेमलेल्या देवतळे समितीच्या शिफारशीनुसार चंद्रपूर येथे दारूबंदी झाली होती. महाराष्ट्रात या निर्णयाचे सर्वत्र स्वागत झाले. महिलांच्या दीर्घ दारूबंदी आंदोलनाने हा निर्णय घेण्यात आला. पण, दारूबंदी उठवण्याचा निर्णयाने दारू विरोधी लढणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व महिलांमध्ये नैराश्य पसरले आहे. ५ वर्षे हजारो महिलांनी केलेल्या प्रदीर्घ अशा आंदोलनाचा कार्यकर्त्यांचा सरकारने अपमान केला आहे. त्यांना नाउमेद केलेआहे, याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...