आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेत्या 20 ते 22 मार्च दरम्यान नागपुरात जी-20 अंतर्गत सी-20 परिषद होत आहे. या निमित्त पाहुण्यांचा प्रवास असलेला भाग चकाचक केला जात आहे. संपूर्ण मार्ग आणि परिसराचे सौंदर्यीकरण आणि सुशोभीकरण केले जात आहे. खास विदेशी झाडे लावली जात आहे. पाहुण्यांना दारीद्र्याचे दर्शन होऊ नये म्हणून पोलिस आयुक्तांनि भिकाऱ्यांविरूद्ध जमावबंदी आदेश जारी केला आहे. आदेश जारी होताच पोलिस पकडतील म्हणून अनेक भिकाऱ्यांनी मूळ गावी पोबारा केला आहे.
सी-20 परिषदे निमित्त येणाऱ्या पाहुण्यांच्या सराबराईची खास तयारी केली जात आहे. विमानतळ परिसर नववधूसारखा सजवण्यात येत आहे. स्वागतासाठी व्हिआयपी लाॅऊंज तयार केला जात आहे. वर्धा रोड ते दीक्षाभूमी दरम्यान चौकात भिकारी भीक मागतात. विशेषत: पारधी समाजातील लहान मुले अनवाणी भीक मागतात. नेमका हाच पाहुण्यांचा मार्ग राहाणार आहे. त्यांच्या दृष्टीला भिकारी पडू नये म्हणून सीपींनी जमावबंदी आदेश काढला.
तृतीयपंथीयांवरील कारवाईनंतर आता चौकाचौकांतील भिकाऱ्यांविरूद्धही जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या निर्णयाने नागपूरकरांना आणखी एक दिलासा मिळाला आहे. गेल्या काही वर्षांपासून शहरात भीक मागणाऱ्यांची संख्या अचानक वाढली. पंचशील चौक, शंकरनगर, लॉ कॉलेज चौक, खामला, सेंट्रल एव्हेन्यू, चितार ओळ, मानेवाडा, छत्रपती चौक, सोमलवाडा चौकांसह अनेक ठिकाणी भिकारी दिसतात. तसेच अनेक भागातील पदपथ व रस्तादुभाजकांवरही त्यांनी ताबा घेतल्याचे चित्र शहरात दिसून येते.
भीक मागण्यासाठी चिमुकल्या मुलांचाही वापर करण्यात येतो. लहान मुले कारच्या बोनेटवर कापडाचा फटका मारून लगेच कारची काच ठोठावून चालकाला पैसे मागतात. भिकाऱ्यांबाबत अनेक तक्रारी पोलिस विभागाकडे आल्या. याची दखल घेत आयुक्तांनी याबाबतचे आदेश जारी केले. हे आदेश ३० एप्रिलपर्यंत लागू राहतील. एकटे किंवा जमावाने भीक मागणाऱ्यांसाठी हे आदेश लागू असणार आहेत. आदेशाचे पालन न करणाऱ्यांविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात येतील. या आदेशाबाबत आक्षेप असणाऱ्यांनी cp.nagpur@mahapolice.gov.in या मेल आयडीवर आक्षेप नोंदवावेत, असे पोलिसांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
यशवंत स्टेडियम परिसरात कारवाई
जमावबंदी आदेश लागू होताच पहिली कारवाई यशवंत स्टेडियम परिसरात करण्यात आली. धंतोली पोलिसांनी या परिसरात राहणाऱ्या तब्बल 150 भिकाऱ्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना त्यांच्या मूळ गावी अमरावती मार्गावरील वडधामना व मोगरा येथे सोडण्यात आले. यात 30 मुले, 40 महिला व 80 पुरूषांचा समावेश आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.