आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली खंत:पत्रावर कारवाई झाली असती तर श्रद्धाचा जीव वाचला असता

नागपूर10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

२०२० ला श्रद्धा वालकर हिने तिच्या जिवाला धोका असल्याचे पत्र पोलिसांना लिहिले होते. त्या वेळी पोलिसांनी कारवाई केली असती तर कदाचित जीव वाचलाही असता, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे बोलताना दिली. आपल्या जिवाला धोका असून आफताब माझ्या जिवाचे बरेवाईट करू शकतो, असे पत्रात स्पष्टपणे नमूद केले होते. पण पोलिसांनी त्यावर काहीच कारवाई केली नाही, अशी माहिती समोर आली. त्यावर बोलताना फडणवीस यांनी कारवाई व्हायला हवी होती, असे सांगितले. ते पत्र माझ्याकडे पण आले आहे. अत्यंत गंभीर पत्र आहे. पण त्यावर कारवाई का झाली नाही याचा तपास करावा लागेल. त्याबद्दल कोणावरही दोषारोपण करू इच्छित नाही. मात्र, अशा प्रकारच्या पत्रावर कारवाई न झाल्यास अशा प्रकारच्या घटना होतात. म्हणून या प्रकरणाचा तपास होईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्रातून एकही गाव कुठे जाणार नाही. उलट आम्ही सर्वोच्च न्यायालयात लढून बेळगाव, कारवार, निपाणीसह आमची गावे मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे माध्यमांशी बोलताना दिली. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील ४० गावांवर कर्नाटक सरकारने दावा सांगितला आहे. तीव्र पाणीटंचाईमुळे कर्नाटकात सहभागी होण्याचा ठराव या ४० गावांनी आता नाही तर २०१२ मध्ये केला होता. आम्हाला पाणी मिळत नाही म्हणून या गावांनी तेव्हा असा ठराव केला होता. मी मुख्यमंत्री असताना कर्नाटकसोबत बोलणी केली होती आणि जिथे पाणी उपलब्ध आहे तिथून पाणी देण्याचा आपण निर्णय केला होता, असे फडणवीस यांनी सांगितले.

म्हैसाळच्या सुधारित योजनेतही त्या गावांना घेण्याचा निर्णय तत्कालीन जलसंधारणमंत्री गिरीश महाजन यांनी घेतला होता. आता त्या योजनेला आपण लवकरच मान्यता देणार आहोत. कोरोनामुळे अडीच वर्षांत महाविकास आघाडी सरकार या योजनेला मान्यता देऊ शकले नसेल. आता मात्र तिथे पाणी पोहोचणार आहे.

सीमावासीयांना मदत या सर्व योजनांना केंद्र सरकारचा पैसा मिळाला असून पैशाची कुठलीही अडचण नाही. आता कर्नाटकचे मुख्यमंत्री जे बोलले ते समजून घेतले पाहिजे. सीमावादाच्या प्रश्नावर आपल्या मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतल्यानंतर अतिशय महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यामुळे सीमाभागातील आपल्या लोकांना मदत करण्याचे आपण ठरवले आहे. त्यांच्यासाठी आधीच्या आणि काही नवीन योजना आपण पोहोचवत आहोत त्यामुळे कर्नाटकचे मुख्यमंत्री असे बोलले असतील.

चर्चा झालीच पाहिजे नुकतीच राज्यपालांची बैठक झाली होती. अशा बैठका झाल्याच पाहिजे. कारण आपण एकाच देशात राहतो. हा एक कायदेशीर पेच आहे. त्यामुळे चर्चा झालीच पाहिजे असे फडणवीस म्हणाले. कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर दावा केला आहे. त्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा उफाळून येणार आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगलीतील जत तालुका कर्नाटकात समाविष्ट करण्याचे सूतोवाच केले.

बातम्या आणखी आहेत...