आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील बहुचर्चित सोनी हत्याकांडप्रकरणी मंगळवारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. जी. अस्मर यांनी सातही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. हा निर्णय ऐकायला नागरिकांनी न्यायालय परिसरात मोठी गर्दी केली होती. खून झालेल्या बारावर्षीय धृमील सोनी याचा आज वाढदिवस होता.
संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणारे हे हत्याकांड २६ फेब्रुवारी २०१४ रोजी घडले होते. तुमसर येथील सोन्या-चांदीचे व्यापारी संजय सोनी (४२), त्यांची पत्नी पूनम सोनी (४०) बारावर्षीय मुलगा धृमील सोनी यांची त्यांचा चालक व त्याच्या ६ साथीदारांनी निर्घृणपणे हत्या केली होती. त्यानंतर त्यांच्या घरातून ८.३ किलो सोने, ३४५ ग्रॅम चांदी आणि रोख ३९ लाख रुपये असा साडेतीन कोटींचा ऐवज पळवला होता. हत्याकांड उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी शहानाबाज उर्फ बाबू सत्तार शेख (२२, रा. रविदास वॉर्ड तुमसर), महेश सुभाष आगासे (२६, रा. रविदास वॉर्ड तुमसर), सलीम नजीरखाँ पठाण (२४, रा. दत्तात्रय वॉर्ड तुमसर), राहुल गोपीचंद पडोळे (२२ रा. अभ्यंकर वार्ड, तुमसर), मोहंमद अफरोज ऊर्फ सोहेल युसूफ शेख (२६ रा. मोठा ताजबाग, आझाद कॉलनी देहलीवाला अम्मा दर्गाच्या मागे, नागपूर), शेख रफिक शेख रहमान (४२ दोन्ही रा. मोठा ताजबाग, आझाद कॉलनी देहलीवाला अम्मा दर्ग्यामागे, नागपूर) आणि केसरी मनोहर डोले (२२ रा. सरदार वॉर्ड तुमसर) या सातही आरोपींना अटक करण्यात आली होती. यातील चार आरोपींना तुमसर येथून, दोन आरोपींना नागपुरातून आणि एकाला मुंबईतून अटक करण्यात आली होती.
तिघांची हत्या करून साडेतीन कोटींचा माल पळवला होता
असे घडले होते हत्याकांड
संजय सोनी यांचा गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील बिरशी फाट्यावर नायलॉनच्या दोरीने गळा आवळला होता. गाडीतून संजय सोनी यांचा मृतदेह घरी आणल्यानंतर त्यांची पत्नी आणि मुलगा धृमील यांचीही निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणात कुणीही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हता. ४५ जणांची साक्ष आणि जबाब नोंदवण्यात आले. सलग पाच वर्षे हा खटला चालला. आरोपींतर्फे भंडारा जिल्ह्यातील एकाही वकिलाने खटला घेतला नव्हता.
निकम यांची महत्त्वाची भूमिका : या प्रकरणात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. साक्षीपुरावे तपासल्यानंतर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. जी. अस्मर यांच्या न्यायालयात सोमवारी आरोपींविरुद्ध दोष सिद्ध झाले. मंगळवारी ७ आरोपींना जन्मठेप सुनावली.
या हत्याकांडात बचावलेल्या संजय सोनी यांच्या मुलीने अॅड. उज्ज्वल निकम यांची भेट घेऊन आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली होती. या हत्याकांड प्रकरणी ८०० पानांचे आरोपपत्र तपास करणाऱ्या तुमसर पोलिसांनी न्यायालयात सादर केले होते. तसेच पोलिसांनी केमिकल आणि डीएनए अहवालासह अन्य अहवाल न्यायालयात सादर केले होते. या पुराव्याच्या आधारे आरोपींवरील गुन्हा सिद्ध झाला. त्या आधारे आरोपींना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.
८०० पानांचे आरोपपत्र केले सादर
दुचाकी लिलावात विकून येणारे पैसे शासकीय तिजोरीत जमा होणार
^तिहेरी सोनी हत्याकांडात प्रत्यक्षदर्शी एकही साक्षीदार नव्हता. असे असतानाही भंडारा पोलिसांनी शिताफीने तपास केला. न्यायालयाने आरोपींना शिक्षा ठोठावताना आरोपींच्या तीन दुचाकीवर कुणीही हक्क सांगितला नसल्याने या दुचाकी लिलावात विकून येणारे पैसे शासकीय तिजोरीत जमा करण्याचे आदेश पोलिसांना दिले.
- उज्ज्वल निकम, सरकारी वकील
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.