आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आमदारकीविरोधात कोर्टात याचिका दाखल करणारे नागपूरचे वकिल सतीश उके यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. जमीन गैरव्यवहार प्रकरणी उके यांना अटक करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. तर या संपूर्ण प्रकरणावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. जे काही कायदेशीर आहे ते कायद्याने होईल, आणि तेच ईडी करतेय, असे देवेंद्र फडणवीस नागपूर विमानतळावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले.
सतिश उके यांच्यावर झालेल्या कारवाईची आपल्याला कल्पना नसून यासंदर्भात मला माध्यमांमधून माहिती झाली. एका जमिनीच्या प्रकरणामध्ये नागपूर पोलिसांनी सतिश उके यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्या गुन्ह्यांमध्ये ईडीने त्यांच्यावर कारवाई केली आहे. मुळ तक्रार आणि मुळ कारवाई ही महाराष्ट्र पोलिसांची आहे. त्यावर आधारीत कारवाई झाली आहे, असे फडणवीस म्हणाले.
याशिवाय, 2005 पासून सतिश उके यांच्याविरोधात मोठ्याप्रमाणात एफआयआर दाखल झाल्या आहेत. वेगवेगळ्या न्यायाधीशांची तक्रार केल्याबद्दल त्यांच्यावर न्यायालयाने कारवाई केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांची शिक्षा का वाढविण्यात येऊ नये, असं म्हटलं होतं. आता कोर्टाचा अवमान केल्याचा ठपका त्यांच्यावर असून हा विषय कोर्टात प्रलंबित आहे. या प्रकरणात जे काही कायदेशीर आहे ते कायद्याने होईल, आणि तेच ईडी करतेय, असे फडणवीस म्हणाले.
देशातील विविध प्रकारच्या शालेय अभ्यासक्रमाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष मुलांच्या मनात विष पेरत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला होता. त्यावर फडणवीस म्हणाले, की हा अभ्यासक्रम पूर्वीपासूनच चालत आलेला आहे. त्यात वेळोवेळी तज्ज्ञांनी बदल केला आहे. अल्पसंख्यकांची मते मिळविण्यासाठी त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न काही नेते करीत आहेत. त्यांची मते मिळविण्यासाठी सद्या 3 पक्षांत स्पर्धा लागली आहे.
मुंबई मेट्रोवरून ठाकरे सरकारवर हल्लाबोल -
आम्ही जे काम अतिशय गतीनं सुरू केलं, त्या दोन मेट्रो मार्गांचे काम पूर्ण होतेय, ही आनंदाची बाब आहे. मुंबईतील कुलाबा मेट्रो लाईन -3 चे सुद्धा 80% काम झाले आहे. पण, कारशेड न मिळाल्यामुळे हे काम ४ वर्ष पूर्ण होणार नाही. आरेचं कारशेड सुरू केल्यानंतर ९ महिन्यात मेट्रो लाईन सुरू होईल. ही लाईन तत्काळ सुरू करण्याचा विचार सरकारनं करावं आणि पुढाकार घ्यावा. अन्यथा श्रेय घेता घेता त्यांना हे अपश्रेय देखील घ्यावं लागेल आणि मुंबईकरांना मोठा त्रास सहन करावा लागेल, अशी टीका फडणवीस यांनी केली.
उकेंची फडणवीसांविरोधात याचिका?
देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्यामुळे त्यांची आमदारकी रद्द करावी, अशी तक्रार सतीश उके यांनी नागपूर सत्र न्यायालयाकडे केली होती. 2014 च्या विधानसभा निवडणुक प्रतिज्ञापत्रात फडणवीसांनी आपल्यावर असलेला गुन्हा लपवला, असे उके यांनी तक्रारीत म्हटलं होतं. याविरोधात देवेंद्र फडणवीस यांना उच्च न्यायालयात जावे लागले होते. उच्च न्यायालयाने देवेंद्र फडणवीस यांना दिलासा देत याचिका निकाली काढली होती. त्यानंतर याप्रकरणी सतीश उके यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. सध्या सुप्रीम कोर्टात या प्रकरणी सुनावणी सुरू आहे.
कोण आहेत अॅड. सतीश उके ?
ॲड. सतीश उके यांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक याचिका दाखल केली होती. त्यावेळीही सतीश उके बरेच चर्चेत राहिले होते. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या बाजूने फोन टॅपिंग प्रकरणात केस लढवली होती. सतीश उके यांना हायप्रोफाईल वकील म्हणून ओळखलं जातं. सतीश उके जिल्हा आणि उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करतात. अनेक मोठ्या प्रकरणात त्यांनी युक्तिवाद केला आहे. सतीश उके हे नाना पटोले यांचे वकील आहेत. त्यामुळं उकेंना टार्गेट केला जात असल्याचा आरोप होत आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.