आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करात्रिपुरारी पौर्णिमेला, सोमवार, ७ नोव्हेंबरला रात्री १२ वाजता रामटेक गड मंदिराच्या कळसावर टिपूर जाळण्यात आला. या वेळी रामटेक, नागपूरसह विदर्भ आणि शेजारच्या राज्यातील हजारो भाविक रामटेक गड मंदिरात उपस्थित झाले होते.त्रिपुरारी पौर्णिमा रामटेक येथे अतिशय वेगळ्या पद्धतीने साजरी करण्याची परंपरा आहे. देवाला वर्षभर परिधान केलेली वस्त्र तुपात भिजवून ठेवण्यात आली होती. त्यानंतर ती वस्त्रे राम मंदिर आणि लक्ष्मण मंदिराच्या कळसावर जाळण्यात आली. त्रिपुरासुरावर भगवान शंकराने विजय मिळवल्याचे स्मरण म्हणून श्रीराम-लक्ष्मण मंदिरावर “टिपूर’ जाळण्याची परंपरा आहे. हा क्षण अनुभवण्यासाठी महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगडसह देशाच्या इतरही भागांतून रामभक्त मोठ्या संख्येत उपस्थित होत असतात.रामटेकच्या प्रसिद्ध रामगिरी टेकडीवर १२ व्या शतकात यादव राजा रामदेवराय यांनी निर्मिलेली श्रीराम-जानकी व लक्ष्मणाची मंदिरे आहेत. पूर्वी येथे पाद्यपूजा होत होती. रघुजीराजे भोसले नागपूरकर यांनी या मंदिरांचा जीर्णोद्धार करून मंदिरात मूर्तींची प्रतिष्ठापना केली. त्यानंतर या मंदिरात विविध उत्सव साजरे करण्यात येऊ लागले.
तीच परंपरा अद्याप गड मंदिरावर सुरू आहे. गड मंदिरावर दोन मोठ्या यात्रा भरतात. एक रामनवमीला तर दुसरी कार्तिक पौर्णिमा अर्थात त्रिपुरारी पौर्णिमेला यात्रा भरते. त्रिपुरारी पौर्णिमेला भगवान शंकराने त्रिपुरासुराचा वध केला होता. त्या दिवसाचे स्मरण चिरंतन रहावे, यासाठी ही यात्रा भरवली जाते.या दिवशी मध्यरात्री ठीक १२ वाजता श्रीराम मंदिर आणि लक्ष्मण मंदिराच्या कळसावर जीर्ण वस्रे तुपात भिजवून जाळली जातात. यालाच टिपूर जाळणे अर्थात टिपूर यात्रा म्हटले जाते. ठीक १२ वाजता श्रीराम मंदिराचे मुख्य पुजारी मुकुंदराव पंडे, धनंजय पंडे, संजय पंडे यांनी श्रीराम मंदिराच्या कळसाजवळ श्रीराम व जानकीची जीर्ण वस्त्रे अग्नीच्या स्वाधीन केलीत. त्यावेळी हा क्षण अनुभवण्यासाठी जमलेल्या हजारो रामभक्तांच्या कंठातून “जय श्रीराम’च्या गगनभेदी जयघोष निनादू लागला.लक्ष्मण मंदिराच्या कळसाजवळ लक्ष्मण स्वामींची जीर्ण वस्त्रे लक्ष्मण मंदिराचे मुख्य पुजारी अविनाश पंडे, राम पंडे, यांनी अग्नीच्या स्वाधीन करताच “जय श्रीराम-जय लक्ष्मण’ हा जयघोष निनादू लागला. सायंकाळी ५ वाजता विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातून राम-कृष्ण रथाचे पूजन करून रथयात्रा प्रारंभ झाली. काकडारती भक्त परिवाराद्वारे रथयात्रेचे आयोजन केले जाते. रथयात्रा रामतलाई धार्मिक मैदानावर पोहोचल्यानंतर तिथे महाआरती होऊन महाप्रसाद घेतल्यानंतर रथयात्रेचा समारोप झाला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.