आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वर्धा:सेवाग्राम येथील वृक्षतोडीची चर्चा गल्ली ते दिल्लीपर्यंत, वृक्षतोडीला देशातील गांधीवादींचा विरोध

वर्धा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तीन पिढ्या एकत्र येत दर्शवला विरोध

सेवाग्राम वर्धा मार्गावरील वृक्षतोडीबाबत अनेक सामाजिक संघटनांनी एकत्र येत लढा दिला आहे. त्याचबरोबर वृक्षतोडीची चर्चा गल्ली पासून ते दिल्लीपर्यंत पोहोचली असून, देशभरातील गांधीजनांनी विरोध दर्शवत गांधी स्मारक निधी या संस्थेच्या वतीने झाडांची तोड थांबवण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

गांधी स्मारक निधी, दिल्ली या अग्रणी संस्थेद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या निवेदनात देशातील गांधी विचारकांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. १९४० च्या दशकात गांधीजींच्या नेतृत्वात ज्येष्ठ सहकारी प्रभाकर जोसेफ, आर्यनायकम, आण्णासाहेब सहस्रबुद्धे यांनी ग्रामवासीयांना सोबत घेऊन वर्धा सेवाग्राम मार्गावर असंख्य झाडे लावली आणि जगवली. यात प्रामुख्याने कडुलिंबाचीही झाडे होती. गांधीजींच्या पर्यावरणप्रेमाची जगाला साक्ष देणाऱ्या या आश्रमाकडे जाणारा हा रस्ता साधेपणा जोपासणारा, अल्प खर्चाचा आणि पर्यावरणाचे संरक्षण करणारा असावा. या मार्गाचे ऐतिहासिक महत्त्व आणि वैचारिक वारसा लक्षात घेऊन याला ‘शांतिपथ’ म्हणून विकसित करावे, अशी विनंती या निवेदनातून केली आहे. वर्धा ते सेवाग्राम मार्गावरील वृक्षांची विकासाच्या नावाखाली होत असलेली कत्तल थांबवण्याकरिता अनेक सामाजिक संघटना एकत्र येत लढा देण्यात आला. वृक्ष तोड होत असल्याची चर्चा गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत पोहोचली असल्याचे दिसून येत आहे.

वृक्ष बचाव नागरिक समितीच्या अभियंता चमूने नवनिर्माणाधीन रस्त्याचा सखोल अभ्यास करून सुधारणा सुचवणारा एक अहवाल सादर केला. या अहवालाचा संदर्भ देत रस्त्याची रुंदी १० मीटर ठेवून या मार्गावरील कापल्या जाणाऱ्या ६९ वृक्षांसह रस्त्यालगतची तब्बल २३५ झाडे वाचवण्याचा पर्याय या निवेदनातून गांधीजनांनी दिला आहे. केवळ सेवाग्राम व वर्धेतीलच नव्हे तर देशभरातील वृक्षतोड थांबवून गांधींच्या तात्विक आणि वैज्ञानिक दृष्टीकोनाचा स्वीकार केला जावा, अशी हाक देशातील ज्येष्ठ गांधीविचारकांनी दिली आहे. हे निवेदन गांधी स्मारक निधीचे केंद्रीय अध्यक्ष रामचंद्र राही, राधा भट्ट (दिल्ली), के. एम. नटराजन (तामिळनाडू), संतोष गोइंदी, गुजरात विद्यापीठातील विचारक दिना पटेल (अहमदाबाद), कुमार शुभमूर्ती (बिहार), धिरुभाई मेहता (मुंबई), सर्वोदय मंडळाच्या आशा बोथरा (राजस्थान), आदींच्या वतीने गांधी स्मारक निधीचे केंद्रीय सचिव संजय सिन्हा यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले आहे.

तीन पिढ्या एकत्र येत दर्शवला विरोध
महात्मा गांधींच्या तीन पिढीतील सदस्यांनी एकत्रित महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, पर्यावरण व पर्यटन मंत्री यांना ‘सेवाग्राम वर्धा मार्गावरील वृक्षतोड न करण्याबाबत’ ईमेलद्वारे निवेदन पाठवले आहे. या निवेदनात तुषार गांधींचे वडील अरुण गांधी, आत्या इला गांधी, काका राजमोहन गांधी व गोपालकृष्ण गांधी आणि तुषारजींची मुलगी कस्तुरी यांनी सेवाग्राम मार्गावरील झाडे वाचवण्याबाबत कळकळीची विनंती केली आहे. महात्मा गांधी यांच्या तीन पिढीतील वारसदारांनी प्रथमच असे संयुक्त निवेदन दिले आहे, हे विशेष!