आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पत्नी खर्रा खाते या एकमेव कारणामुळे घटस्फोट दिला जाऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. खर्रा (तंबाखूयुक्त मावा) खाण्याचे व्यसन गंभीर असले तरी या कारणास्तव घटस्फोट मंजूर केला जाऊ शकत नाही, असे नमूद करून खंडपीठाने पतीची याचिका फेटाळून लावली. नागपूरमधील शंकर आणि रीना या दांपत्याच्या घटस्फोटाच्या प्रकरणात नागपूर खंडपीठासमोर सुनावणी झाली. या वेळी न्यायमूर्ती अतुल चांदूरकर आणि पुष्पा गनेडीवाला यांनी हा निर्णय दिला. न्यायमूर्ती पुष्पा गनेडीवाला यांनी बाललैंगिक शोषणाबाबत याआधी दिलेल्या दोन वादग्रस्त निकालांमुळे त्या चर्चेत आल्या.
नागपूरचे रहिवासी असलेल्या शंकर आणि रीना यांचे १५ जून २००३ रोजी लग्न झाले. रीना घरातील दैनंदिन कामे करीत नाही, क्षुल्लक कारणावरून वाद घालते, न सांगता माहेरी जाऊन एक-एक महिना राहते, आपल्याला रोज डबा करून देत नाही, अशा आरोपांची सरबत्ती पती शंकर यांनी याचिकेत पत्नी रीनावर केली होती. पत्नीला खर्रा खाण्याचे व्यसन आहे. त्यामुळे तिच्या पोटाच्या आजारावर उपचार करण्यासाठी महागडा खर्च करावा लागला, असा दावाही शंकरने घटस्फोट मिळवण्यासाठी केलेल्या याचिकेत केला होता.
खर्रा खाण्याचे व्यसन वगळता इतर आरोप सामान्य स्वरूपाचे आहेत, असे किरकोळ वाद संसारात होतातच, असे मत हायकोर्टाने व्यक्त केले. पत्नी खर्रा खाते हा आरोप गंभीर आहे, मात्र त्या एकमेव कारणावरून घटस्फोट दिला जाऊ शकत नाही.
दोघांनी एकत्र राहण्यातच मुलांचे हित : कुटुंब न्यायालय
शंकरने याआधी कुटुंब न्यायालयात दाखल केलेली याचिकाही फेटाळण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. शंकर आणि रीना यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगा रीनासोबत, तर मुलगी शंकरसोबत राहते. शंकर आणि रीना यांचे लग्न टिकून राहण्यातच मुलांचे हित आहे, असे मत कुटुंब न्यायालयाने व्यक्त केले होते. उच्च न्यायालयाने तेच मत ग्राह्य धरीत याचिका फेटाळली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.