आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपुरात कुत्र्यांचा उच्छाद:वर्षभरात 6 हजाराहून अधिक नागरिकांना घेतला चावा, 2 वर्षांपासून नसबंदी व लसीकरण बंद

नागपूर9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात नव्याने भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर झाला आहे. विशेषत: रात्रपाळी करून घरी जाणाऱ्यांना हा त्रास जास्त आहे. मात्र तक्रारी वाढताच महापालिकेने धरपकड सुरू केल्याने प्राणी प्रेमी यावर रोष व्यक्त करीत आहे. शहरात गेल्या वर्षभरात 6 हजार 806 नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे. यात भटक्या तसेच काही पाळीव कुत्र्यांचाही समावेश आहे.

शहराचा वाढता विस्तार, कुठेही टाकला जाणारा कचरा यामुळे भटक्या कुत्र्यांची समस्या गंभीर झाली आहे. या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्याचे काम महापालिकेच्या आरोग्य विभागाचे आहे. परंतु, गेल्या दोन वर्षांपासून नसबंदी व लसीकरण करण्यात झालेले नाही. त्यामुळे भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. ही कुत्री विशेषत: रात्रीच्या वेळी वाहनांच्या मागे धावत असल्यामुळे नागरिकांना वाहन चालवणे कठीण झाले आहे.

लसीकरण बंद

2019 मध्ये नसबंदी अभियान राबवण्यात आले होते. मात्र त्यानंतर हे अभियान बंद करण्यात आले. आधी तक्रार आल्यास आरोग्य निरीक्षक संबंधित भागातून कुत्री पकडून त्यांना जवळच्या केंद्रात दाखल करत होते. तेथे त्यांच्यावर नसबंदी शस्त्रक्रिया करण्याबरोबरच अँटी रेबीज लसही दिली जात होती. मात्र गेल्या दोन वर्षांपासून हे काम बंद आहे. त्यामुळे शहरात कुत्र्यांची संख्या वाढली आहे.

महालात 3 हजार प्रकरणे

भटक्या कुत्र्यांबरोबरच नागरिकांनी हौस म्हणून पाळलेल्या कुत्र्यांकडूनही चावा घेतल्याच्या घटना वाढत आहेत. कुत्र्यांनी चावा घेतल्याची सर्वाधिक 3 हजार 556 प्रकरणे महालातील आहेत. त्यानंतर 1744 प्रकरणे सदर भागातील आहेत. मार्च 2022 मध्ये सर्वाधिक 817 लोकांना कुत्र्यांनी चावा घेतला. भटकी कुत्री चावण्याचे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढले आहे.

नसबंदी करु

2021 मध्ये 4 हजार 585 तर 2022 मार्चपर्यंत 2 हजार 221 लोकांना कुत्र्यांनी चावा घेतला. नियमानुसार भटक्या कुत्र्यांवर नसबंदी करून त्यांनी मूळ जागी सोडण्यात येईल, असे महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांनी सांगितले.

निवासी डॉक्टरांना चावा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल) परिसरात चार निवासी डॉक्टरांना भटक्या श्वानांनी चावा घेतल्यानंतर भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला. मेडिकल परिसरात मोकाट श्वानांची संख्या अधिक असल्याने अधिकारी- कर्मचाऱ्यात दहशत कायम आहे.

बातम्या आणखी आहेत...