आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउपासना आणि पूजा पद्धती वेगळी असली म्हणून कोणाचा डीएनए बदलू शकत नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत चुकीचे काही बोलले नाहीत. या देशातील मुस्लिम समाज बदलण्याच्या मानसिकतेत असून त्यांना विचारधारेशी जोडण्यासाठी आम्हीच कृती आराखडा तयार करू आणि त्याची अंमलबजावणीही करू. फक्त हा अॅक्शन प्लॅन योग्य वेळी सांगू, असे मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे मार्गदर्शक आणि रा. स्व. संघाचे वरिष्ठ कार्यकारिणी सदस्य इंद्रेशकुमार यांनी “दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.
गाझियाबादमधील मुस्लिम राष्ट्रीय मंचाच्या कार्यक्रमात बोलताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी “या देशातील हिंदू व मुस्लिमांचा डीएनए एकच आहे’ असे वक्तव्य केले होते. त्याचे पडसाद संपूर्ण देशभर उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर इंद्रेशकुमार यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी भूमिका स्पष्ट केली. “या देशातील हिंदू व मुस्लिमांचा डीएनए एकच आहे’ हे शाश्वत सत्य आहे. केवळ उपासना व पूजा पद्धती बदलल्याने काही होत नाही. मुस्लिम राष्ट्रीय मंच अनेक वर्षांपासून मुस्लिम समुदायासोबत काम करीत आहे. अनेक गोष्टीत मुस्लिम बदलत आहेत. हळूहळू अपेक्षित सर्व बदल होतील. त्यासाठी आणखी काही काळ जाऊ द्यावा लागेल. इतकी घाई करू नका. कोणाच्या घाईने परिवर्तन लवकर होणार नाही. ते त्याच्या गतीनेच होईल, असे इंद्रेशकुमार म्हणाले. आम्ही भारतीय आहोत. हिंदुस्थानचे हिंदुस्थानी आणि इंडियाचे इंडियन आहोत. डीएनए एकच आहे हे समजून घेतले तर या देशातील धर्मांतर थांबेल. धार्मिक तेढ कमी होऊन दंगलीही होणार नाहीत, असे ते म्हणाले. मुस्लिमांनी आता विचार करणे सुरू केले आहे. तेही पुढाकार घेत आहेत. परिवर्तनाची लाट येत आहे. मुस्लिमांकडून नव्या विचारांचे स्वागत होत आहे. थोडा धीर धरा. लव्ह जिहाद, दंगे, हिंसा, धर्मांतर आणि धर्मांधता, धार्मिक कट्टरवाद सारे संपून जाईल, असा आशावाद इंद्रेशकुमार यांनी व्यक्त केला.
डाॅक्टर ख्वाजा इफ्तिखार यांनी त्यांच्या पुस्तकात मुस्लिमांनी संघ व भाजपचा द्वेष करण्याऐवजी संपर्क साधून संवाद करायला हवा, असे म्हटले आहे. संघ व भाजपचा द्वेष करून नुकसानच झाल्याचे त्यांनी म्हटले होते. हा मुस्लिमांमधील बदल नसून १९२५ पासून आजपर्यंतची कंटिन्युटी (सातत्य) आहे, असे ते म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.