आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआजच्या शिक्षण पद्धतीसारखी शोकांतिका नाही. शेतीनंतरची सगळ्यात मोठी इंडस्ट्री शिक्षणाची आहे. एका अर्थाने आजची शिक्षण पद्धती म्हणजे रोजगार हमी योजना असून मुलांचा रेसकोर्स झाला आहे, अशी खरमरीत टीका 'महाराष्ट्र भूषण' डॉ. अभय बंग यांनी केली आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आज मुक्ता पुणतांबेकर, विनोद शिरसाट व विवेक सावंत यांनी डाॅ. अभय बंग यांची प्रकट मुलाखत घेतली. यावेळी डॉ. अभय बंग यांनी रोखठोक भूमिका घेतली.
डॉ. अभय बंग म्हणाले, सुमारे १५ ते २० कोटी लोकांना रोजगार देणारी शिक्षण ही इंडस्ट्री आहे. आजची शिक्षण व्यवस्था मुलांचे खच्चीकरण करून त्यांना बैल म्हणून कामाला जुंपण्याचे काम करते. "निर्जीव शिक्षण आणि निर्बुद्ध जगणे' असे विनोबा म्हणायचे. अगदी तसेच शिक्षण आता मिळत आहे. यातून बाहेर यायचे असेल तर विनोबा म्हणत त्याप्रमाणे जीवन हेच शिक्षण या सूत्राने शिक्षण घेतले पाहिजे.
समाजात समस्या आहेत तोपर्यत संशोधक आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे काम कधीही संपू शकत नाहीत. म्हणून सामाजिक कार्यकर्ता कधीही निवृत्त होऊ शकत नाही. अलिकडे संशाेधनासाठी प्रश्नच सापडत नाही. म्हणून अपवाद वगळता बहुतांश संशोधन निरूपयोगी विषयांवर होते, याकडे डाॅ. बंग यांनी लक्ष वेधले.
समाजात खूप समस्या आणि प्रश्न आहेत. लोकांचे ऐकण्याची आणि त्यांच्याकडून शिकण्याची तयारी ठेवली म्हणजे संशोधनासाठी नवनवीन विषय मिळतात. आम्ही अशा पद्धतीने केलेल्या संशोधनामुळे अनेकदा जागतिक आरोग्य संघटनांच्या संशाेधनाला नवी दिशा मिळाली, हे अनेक उदाहरणे देऊन डाॅ. बंग यांनी स्पष्ट केले.
तेराव्या वर्षी मिळाले जीवनाचे ध्येय
डॉ. अभय बंग यांनी सांगितले की, माझा मोठा भाऊ अशोक १६ आणि मी १३ वर्षांचा होतो. त्यावेळी अशोकने आता आपण मोठे झाल्यामुळे एक ध्येय निश्चित करून काम केले पाहिजे असे सांगितले. अशोकने शेती सुधारणेत काम करायचे ठरवल्यानंतर माझ्यासाठी आरोग्य क्षेत्र राहिले. वयाच्या १३ व्या वर्षीच जीवनाचे ध्येय मिळाले.
गांधींकडे ललित लेखकांचे दुर्लक्ष
महाभारतानंतर महात्मा गांधींचे जीवन आणि त्यांचा स्वातंत्र्यलढा हा लेखनासाठी खूप मोठा कॅनव्हाॅस आहे. पण, दुर्दैवाने या कॅनव्हाॅसकडे ललित लेखकांचे कमालीचे दुर्लक्ष झाले आहे. १९२० ते १९४७ या कालखंडाकडे लेखकांनी दुर्लक्ष का केले?, हा प्रश्नच आहे.
रशियन क्रांतीवर मॅक्झिम गार्कीने 'मदर' ही कादंबरी लिहिली तर फ्रेंच क्रांतीवर व्हिक्टर ह्युगोने "ला मिझरेबल'' लिहिली. पण, गांधींइतका सुंदर आणि मोठा कॅनव्हाॅस असूनही ललित लेखक त्यापासून निर्लिप्त राहिले, असे डॉ. बंग म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.