आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूर:बाटलीतून राज्यात घरपोच हिंसा, कोरोना पोहोचवण्याची राज्य शासनाची योजना, डॉ. अभय बंग यांची संतप्त टीका

नागपूर 2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशभरात दरवर्षी दारूमुळे होताे पाच लाख लाेकांचा मृत्यू

कोरोना संकटात लागू झालेली दारुबंदी उठवण्याचा सरकारचा निर्णय अतर्क्य आणि धोक्याचा असून बाटलीच्या माध्यमातून घरपोच हिंसा आणि कोरोनाचा संसर्ग पोहोचविण्याची ही योजना असल्याची  टीका ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांनी सरकारच्या निर्णयावर केली आहे.

देशातील दारुची दुकाने सुरू करण्याच्या निर्णयावर डॉ. बंग यांनी संताप व्यक्त केला. डॉ. बंग म्हणाले, “केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनाने कोरोना प्रसार थांबविण्यासाठी आतापर्यंत स्तुत्य पावले उचलली. रविवारी लॉकडाऊनचा दुसरा टप्पा संपता संपता शासनाने देशातील रेड झोन मधील प्रतिबंधित क्षेत्र वगळता बाकी सर्वच ठिकाणची दारूबंदी उठवली. हा निर्णय अतर्क्य आणि तितकाच धोक्याचा आहे.’

“भारतात आतापर्यंत ४२ हजारांवर लोकांना कोरोना आजाराचा संसर्ग झाला आहे. १३०० च्या वर मृत्यू झाले आहेत. ही आकडेवारी दिवसेंदिवस वाढत आहे. पण त्याच वेळी भारतात दर वर्षी दारूमुळे ५ लाख मृत्यू होतात. भारतातील ५ कोटी लोक दारूच्या व्यसनाने ग्रासित असल्याचे जागतिक आरोग्य संघटना सांगत आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी अनेक प्रकारची बंदी कायम ठेवताना शासनाने दारूच्या विक्रीला परवानगी दिली आहे.  शासनाने हत्ती सोडला आणि शेपूट धरून ठेवले आहे..” असे डॉ. बंग म्हणाले.

काम बंद, मात्र दारू सुरू करण्याचे रहस्य काय ?

दारूची दुकाने उघडल्यावर गर्दी होणारच. अंतराचे नियमही तोडले जातील. या गर्दीतून पुरुष बाटली घरी घेऊन येतील. घरपोच हिंसाही घेऊन येतील. त्यामुळे लोकांना घरपोच कोरोना पोहोचविण्याची योजना असावी, असे स्वरूप शासनाच्या या निर्णयामुळे निर्माण होईल, असे डॉ. बंग म्हणाले. कोरोनामुळे शासनाने दारू, खर्रा व तंबाखूवर बंदी घातली होती. त्याचा हजारो पटीने फायदा या काळात झाला. ही बंदी कायम ठेवली असती तर लोकांचा आणखी फायदा झाला असता. पण दुर्दैव असे की दारुमुळे मार खाणारी जनता बोलत नाही. ती उलट दारूच्या दुकानासमोर रांग लावते. जनतेचे हित आणि आरोग्य हा जर शासनाचा हेतू असेल तर अशा निर्णयामुळे त्यावर पाणी फेरले जात असल्याचे डॉ. बंग म्हणाले. काम बंद, कमाई बंद पण दारू सुरू हे करण्यामागचे रहस्य काय? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

राज्यातील नागरिकांच्या आराेग्यापेक्षा राज्य सरकारला दारूचे आर्थिक उत्पन्न महत्त्वाचे

पुणे | लाेकांच्या आराेग्यापेक्षा सरकारला दारूचे आर्थिक उत्पन्न महत्त्वाचे वाटत असल्याची टीका सामाजिक कार्यकर्त्यांनी केली असून सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. व्यसनमुक्ती क्षेत्रात मागील ४० वर्षांपासून काम करत असलेले डाॅ. कल्याण गंगवाल म्हणाले, लाॅकडाऊनमध्ये दारू, तंबाखू, सिगारेट मिळत नसल्याने त्याचे सेवन करणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय घटले. अशा वेळी दारूची दुकाने पुन्हा उघडली गेल्याने लाेकांनी गर्दी केली आहे. काेराेनाचा धाेका यामुळे वाढणार असल्याचे सांगितले.

व्यसनमुक्ती केंद्रासमाेरच्या दारू दुकानात तळीरामांची मोठी गर्दी

मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका मुक्ता पुणतांबेकर म्हणाल्या, लाॅकडाऊनमुळे दारूबंदीचा चांगला फायदा झाल्याचे दिसून आले आहे. दारूची दुकाने उघडण्याचा निर्णय चुकीचा आहे. मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रासमाेरच्या दारू दुकानातही लाेकांनी सकाळपासून गर्दी केली होती.

बातम्या आणखी आहेत...