आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआधार जोडणी आणि केवायसी नसल्यामुळे राज्यात 31 लाख 83 हजार शेतकऱ्यांवर पीएम किसान हप्त्यापासून वंचित राहाण्याची वेळ आली आहे. यामध्ये 18 लाख 96 हजार 953 शेतकऱ्यांनी अजूनही केवायसी पूर्ण केलेली नसून 12 लाख 86 हजार 687 शेतकऱ्यांनी त्यांचे बँक खाते आधारशी जोडलेले नाही.
पीएम किसानसाठी राज्यात 1 कोटी 16 लाख 88 हजार 871 शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे. त्यापैकी 98 कोटी 05 लाख 275 हजार शेतकरी योजनेसाठी पात्र ठरल्याची माहिती पी. एम. किसान योजनेचे राज्यस्तरीय अंमलबजावणी प्रमुख सुनील चव्हाण यांनी दिली आहे.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजने अंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबाला 2000 रूपये प्रति हप्ता या प्रमाणे 6000 रूपये प्रति वर्षी लाभ देण्यात येतो. योजनेच्या 14 व्या हप्त्याचा लाभ मे महिन्याच्या शेवटच्या किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात जमा होणार आहे. केंद्र शासनाने 14 व्या हप्त्याचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थींनी त्यांचे बँक खाते आधार क्रमांकाशी जोडणे बंधनकारक केले आहे. राज्यात सद्यस्थितीत 12.91 लाख लाभार्थींची बँक खाती त्यांच्या आधारक्रमांकाला जोडलेली नाहीत. त्यामुळे या लाभार्थीच्या खात्यात 14 व्या हप्त्याचा लाभ जमा होणार नाही.
लाभार्थीना त्यांचे बँक खाते आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा त्यांच्या गावातील पोस्ट मास्तर यांच्यामार्फत उपलब्ध करण्यात आली आहे. यासाठी आधार कार्ड, मोबाईल क्रमांक या कागदपत्रांच्या आधारे आपल्या गावातील पोस्ट विभागाचे कर्मचारी यांच्यामार्फत इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत (आयपीपीबी) मध्ये खाते उघडावे. सदरचे बँक खाते आपल्या आधार क्रमांकाशी 48 तासात जोडल्या जाईल. सदरची पद्धत कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांशिवाय करता येणार असल्याने अत्यंत सोपी व सुलभ आहे. आयपीपीबीमध्ये बँक खाते सुरू करण्याची सुविधा आपल्या गावातील पोस्ट कार्यालयातच उपलब्ध असल्याने लाभार्थीना इतरत्र जाण्याची गरजही पडणार नाही.
पीएमकिसान योजनेतील प्रलंबित लाभार्थींची बँक खाती आयपीपीबीमध्ये उघडून ती आधार क्रमांकाला जोडण्यासाठी राज्याच्या आयपीपीबी कार्यालयास गावनिहाय याद्या उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याप्रमाणे गावातील पोस्ट मास्टर या लाभार्थीना संपर्क करून आयपीपीबीमध्ये बँक खाती सुरू करतील. योजनेच्या 14 व्या हप्त्याच्या लाभासाठी आधार संलग्न बँक खाते अनिवार्य केलेले असल्याने आयपीपीबी मार्फत 01 मे 2023 ते 15 मे 2023 या कालावधीत यासाठी गाव पातळीवर सर्वत्र मोहीम राबविण्यात येत आहे. राज्यातील सर्व प्रलंबित लाभार्थीनी त्यांचे बँक खाते उघडावे, असे आवाहान राज्याचे कृषी आयुक्त तथा पी. एम. किसान योजनेचे राज्यस्तरीय अंमलबजावणी प्रमुख सुनील चव्हाण यांनी केले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.