आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nagpur
  • During The Discharge Of Kanhoba, The Name Changed In The Wainganga Riverbed In Bhandara District, The Incident Occurred Due To Imbalance.

भंडाऱ्यात खवळलेल्या वैनगंगेत नाव उलटली:कान्होबाचे विसर्जन करताना घडली घटना, नावेतील 6 जण थोडक्यात बचावले

नागपूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त प्रत्येक घरात गुरुवारला श्रीकृष्णाची स्थापना झाली. या कान्होबाचे शुक्रवारला विधिवत विसर्जन करण्यात आले. कान्होबाचे विसर्जन करण्याकरिता एका नावेत बसून ग्रामस्थ वैनगंगा पात्रात गेले होते. संतुलन बिघडल्याने वैनगंगा नदीच्या विस्तीर्ण पात्रात नाव उलटली. यात नावड्यांच्या समसूचकतेने सर्वांना सुरक्षित वाचविण्यात आले. यामुळे मोठी प्राणहानी टळली. ही घटना भंडारा तालुक्यातील खमारी (बुट्टी) येथे शुक्रवारी सायंकाळी घडली. त्याचा व्हिडिओ समाजमाध्यमावर शनिवारी सकाळपासून मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याने ही घटना उघडकीस आली.

भंडारा तालुक्यातील वैनगंगा नदीच्या तीरावर खमारी (बुट्टी) हे गाव वसले आहे. नुकत्याच आलेल्या महापुरातून गावाचा संभाव्य धोका टळला. त्यानंतर गुरुवारला श्रीकृष्ण जन्माष्टमी असल्याने गावातील अनेकांच्या घरात श्रीकृष्णाची विधिवत स्थापना करण्यात आली. शुक्रवारला या कान्होबाला मोठ्या वाजतगाजत सर्व ग्रामस्थांनी एकत्र विसर्जन करण्याचे ठरविले. त्याकरिता सर्व ग्रामस्थांनी ऐतिहासिक अशा सुमारे 300 वर्षाच्या वडाच्या झाडाखाली असलेल्या मंदिर परिसरात घरातील कान्होबे आणले. विधिवत पूजाअर्चना करून मोठ्या थाटात श्रीकृष्णाला निरोप देण्यात येत होता.

एका नावेत 6 जण बसले

सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास गावातील रमेश मेश्राम यांच्या नावेत बसून सेवानिवृत्त सैनिक गजानन पेसने त्यांचा मुलगा, मंगेश मोहतुरे, प्रमोद पवनकर आणि अन्य असे पाच व्यक्ती कान्होबासह बसले. यावेळी नावेसह सर्वजण वैनगंगा नदीच्या विस्तीर्ण पात्रात पोहोचले. दरम्यान, कान्होबा ठेवण्याची स्थिती बदलविताना संतुलन बिघडले आणि नाव हलायला लागली. यात संतुलन बिघडताना बघून नावाड्याने वैनगंगा पात्रात उडी घेतली आणि नाव असंतुलित होऊन नावेतील सर्वजण वैनगंगा नदीत नावेसह उलटले.

समयसूचकता दाखविल्याने वाचले प्राण

मंदिर परिसरातील तीरावर ग्रामस्थ उभे होते. दरम्यान पात्रातील नाव असंतुलित होत असताना सर्व ग्रामस्थांनी आरडाओरड केली. दरम्यान, तिथे असलेल्या नावाड्यांनी त्यांच्या नावाने तातडीने घटनास्थळ गाठले. नदीत उलटलेल्या सर्वांच्या भोवताल सर्वांनी नावा लावून त्यांना तातडीने मदतीचा हात देत पाण्याबाहेर काढले. यामुळे मोठी दुर्घटना टळली.

या नावड्यांमुळे मोठी जीवितहानी टळली

दुर्घटना घडताच नदी किनारा असलेले ढेकल मेश्राम, प्रज्वल मेश्राम, शरद मेश्राम, मुन्ना मांढरे, बिरजू मेश्राम, कुणाल मेश्राम यांनी त्यांच्या नावा तातडीने वैनगंगा नदीच्या पात्रात नेल्या. या नावाड्यांनी दाखविलेले साहस आणि समयसूचकता यामुळे खमारी (बुट्टी) येथील मोठी प्राणहानी टळली.

बातम्या आणखी आहेत...