आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ:काटोल आणि वडविहिरातील निवासस्थानी ईडीचा छापा, मालमत्तांची अधिकाऱ्यांकडून झाडाझडती

नागपूर2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची चौकशी केली जात आहे. रविवारी अनिल देशमुख यांच्या नागपूरमधील काटोल आणि वडविहिरा येथील निवासस्थानी ईडीने धाडी टाकल्या. ईडीने आधीच देशमुख यांची 4 कोटी 20 लाख रुपयांची मालमत्ताही जप्त केलेली आहे. यामुळे देशमुख यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नागपूर जिल्ह्याच्या काटोल आणि नरखेड तालुक्यातील वडविहिरा येथे अनिल देशमुख यांचे वडिलोपार्जित घर आहे.

वाझेच्या माहितीच्या आधारे ईडीची कारवाई :
मुंबईतील बार मालकांकडून देशमुख यांनी ४.७० कोटींची रक्कम गोळा केल्याचा जबाब १०० कोटी रुपये वसुलीच्या आरोपात अटकेत असलेला निलंबित सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे याने ईडीला दिलेला आहे. या माहितीच्या आधारे सदर जप्तीची कारवाई करण्यात येत आहे, असे ईडी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ईडीच्या या कारवाईने अनिल देशमुख यांच्याबरोबरच राष्ट्रवादी आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या अडचणींत भर पडली आहे. तसेच देशमुख यांना कधीही अटक होऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ईडीचे दावे :
१.
देशमुख कुटुंबीयांनी भ्रष्टाचाराचे ४.१८ कोटी रुपये त्यांच्या मालकीच्या साई शिक्षण संस्थेत वळवले आणि ते कायदेशीर करून स्थावर मालमत्ता खरेदीत गुंतवले.
२. प्रीमियर पोर्ट लिंक प्रा. लि. या कंपनीत देशमुख कुटुंबीयांनी ५० टक्के मालकी मिळवली. या कंपनीची स्थावर मालमत्ता ५.३४ कोटी रुपये आहे. मात्र देशमुख कुटुंबीयांनी केवळ १७.९५ हजारांत ही भागीदारी मिळवली, तीसुद्धा फार नंतर.
३. वरळीच्या सुखदा इमारतीत आरती देशमुख यांच्या नावे असलेली सदनिका २००४ मध्ये खरेदी केली. मात्र फेब्रुवारी २०२० मध्ये देशमुख गृहमंत्री असताना विक्री व्यवहार झाला.

देशमुख १४ कोटीच्या मालमत्तेचे मालक
अनिल देशमुख हे १४ कोटीच्या संपत्तीचे मालक असल्याचे २०१९ मध्ये दिलेल्या निवडणूक शपथपत्रातील माहितीवरून स्पष्ट होते. देशमुख यांनी २०१९ मध्ये नागपूरच्या काटोल विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यांनी शपथपत्रात दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे १४ कोटी ६ लाख रुपयांची संपत्ती आहे. त्यात १२.९ कोटी रुपये अचल आणि १.७ कोटी रुपयांची चल संपत्ती आहे. त्यांच्यावर ४.६ कोटींचे कर्जही आहे. देशमुख यांनी दागिन्यांमध्ये २९ लाख २६ हजार रुपयांची गुंतवणूक केली आहे. तर एलआयसीमध्ये २ लाख ९७ हजार रुपयांची गुंतवणूक केली आहे. बाँड, शेअर्स आणि डिबेंचरमध्येही त्यांनी ३ लाख ८६ हजारांची गुंतवणूक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देशमुख यांच्याकडे १ कोटी १९ लाख रुपयांची शेतजमीन आहे. तर ४ कोटी १५ लाखांची बिगर शेती आहे. नवी मुंबई आणि वरळीत दोन फ्लॅट आहे. एकाची किंमत २ कोटी २३ लाख तर दुसऱ्याची किंमत ५ कोटी २७ लाख आहे.

बातम्या आणखी आहेत...