आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई-नागपूरला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या नागपूर-शिर्डी या 520 किलोमीटरच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण 11 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्यापूर्वी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या समृद्धी महामार्गाची पाहणी करत आहे. नागपूर ते शिर्डी अशा एकत्रित प्रवासाला त्यांनी सुरूवात केली आहे.
शिंदे-फडणवीस एकाच वाहनात
समृद्धी महामार्गाचे झिरो माईल असलेल्या हिंगणा आऊटर रिंग रोडवरील शिवमडका गावापासून हा प्रवास सुरू झाला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, रस्ते विकास महामंडळाचे एम. डी. राधेश्याम मोपलवार, जाॅइंट एमडी अनिल गायकवाड हे एकाच कारमध्ये बसले होते. नागपूरपासून स्टेअरिंग उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हाती घेतले आहे.
राज्याचा कारभार असाच सुसाट हाकू
तत्पूर्वी नागपूर येथे माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही खऱ्या अर्थाने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गाने चालणारे आहेत. राज्याचा या पुढील प्रवासही बाळासाहेबांनी दाखवलेल्या मार्गानेच होईल. आम्ही ज्या वेगाने आमच्या गाड्या चालवणार आहोत, त्याच वेगाने राज्याचा कारभारही हाकत आहोत. यापुढेही राज्याचा कारभार असाच सुसाट हाकू. आमचे सरकार वेगाने काम करणारे आहे.
प्रसाद लाड यांचे वक्तव्य फेटाळले
दरम्यान, आज भाजप नेते प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला असे वादग्रस्त वक्तव्य केले. त्यावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरीवर झाला आहे, हा इतिहास सर्वांना माहिती आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे, असे म्हणत प्रसाद लाड यांच्या वक्तव्याला शिंदेंनी फेटाळून लावले.
फडणवीसांची संकल्पना
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून समृद्धी महामार्ग साकारला. आज या महामार्गाचे लोकार्पण होत असल्याचा मला आनंद आहे. कारण या मार्गाची मुहुर्तमेढ रोवली गेली, त्यावेळी या खात्याचा मंत्री होताे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
समृद्धी महामार्गाचे वैशिष्ट्ये
समृद्धी महामार्गात नागपूर, वर्धा, अमरावती, वाशीम, बुलडाणा, जालना, औरंगाबाद, नगर, नाशिक आणि ठाणे अशा 10 जिल्ह्यांचा समावेश आहे. यातून 26 तालुके जोडण्यात येत असून, 392 गावांतून महामार्ग जाणार आहे. 710 किलोमीटर लांबीच्या महामार्गावर 1700 पूल आहेत. या महामार्गामुळे नागपूर ते मुंबई हे अंतर केवळ 8 तासांत कापता येणे शक्य होणार आहे.
दरम्यान, आज नागपूर येथून फडणवीस व शिंदे हे सायंकाळी 5 वाजेपर्यंत शिर्डीत येण्याची शक्यता आहे. तेथून मुख्यमंत्री दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती आहे.
कृपाल तुमानेंच्या घरी भेट
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी रामटेक येथील खासदार कृपाल तुमाने यांचे पुतणे जयेश व चि. सौ. कां. गार्गी यांच्या विवाहानिमित्त त्यांच्या निवासस्थानी जाऊन अभिनंदन केले. नव्या आयुष्यासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.