आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासर्व आव्हानात्मक क्षेत्रात भारतीय महिला वैज्ञानिकांनी आपल्या कामाची छाप सोडली आहे. राष्ट्राच्या विकासात विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा सिंहाचा वाटा राहिला आहे. वैज्ञानिक आणि संशोधकांना संधी उपलब्ध करून देण्यात महाराष्ट्र अग्रेसर असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केले.
पंतप्रधानांच्या हस्ते मंगळवार 3 जानेवारी रोजी 108 व्या भारतीय विज्ञान काँग्रेसचे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. विज्ञान परिषदेतून उत्तम वैज्ञानिक घडतील असे शिंदे म्हणाले.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आजचे वैज्ञानिक आणि संशाेधक हे ऋषीमुनींप्रमाणे द्रष्टे असल्याचे सांगितले. ऋषीमुनींप्रमाणे वैज्ञानिक आणि संशोधकांनी काळाच्या पुढचे पाहात प्रगतीची कास धरावी. आज कृत्रीम बुद्धीमत्तेचा जमाना असला तरी कोणीही अध्यात्माला धरून राहिले पाहिजे असे कोश्यारी यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान भेदभाव करीत नसल्याचे सांगितले. त्यामुळे सर्वांना विकसित होण्याची संधी मिळते असे ते म्हणाले. महिला सक्षमीकरणात आम्ही मोठा पल्ला गाठू असे ते म्हणाले.
केंद्रीय मंत्री विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि पृथ्वी विज्ञानमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी वैज्ञानिक प्रगतीमुळे जग भारताकडे आदराने पाहात असल्याचे सांगितले. भारताच्या वैज्ञानिक अनुभवातून शिकत जगभरातील विकसित देश आपल्या संशोधनाला पुढे नेत असल्याचे सिंह यांनी सांगितले. गेल्या आठ ते नऊ वर्षात मोदींनी विज्ञान तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासोबतच विज्ञान आणि वैज्ञानिकांना आदर आणि प्रतिष्ठा दिल्यामुळेच हे शक्य झाल्याचे सिंह यांनी सांगितले.
आरटीएमएनयू शताब्दी सोहळ्याच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आत्मनिर्भर भारत आणि फाईव्ह ट्रिलियन डाॅलरची इकाॅनाॅमी करण्यासाठी विज्ञानाचाही वाटा महत्वाचा असल्याचे सांगितले. गाव, गरीब, मजूर आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उपयोग झाला पाहिजे असे गडकरी म्हणाले. गरजेवर आणि प्रादेशिक आधारित संशोधनाची गरज असल्याचे गडकरींनी सांगितले.
भाजपाच्या मिशन 2024 च्या चंद्रपूर आणि औरंगाबाद येथील दोन्ही विजयी संकल्प सभांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अंगात ताप असल्यामुळे अनुपस्थित राहिले. रविवारी रात्री फडणवीसांना 103 पर्यंत ताप चढल्याने ते सोमवारच्या सभांना अनुपस्थित राहिल्याचा खुलासा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी केला. मात्र मंगळवारी विज्ञान परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमाला फडणवीस आवर्जुन आल्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या. फडणवीसांच्या उपस्थितीची चर्चा कार्यक्रमस्थळी रंगली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.