आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात दाखल झालेला हत्तींचा कळप पाहायला दुचाकीने जाणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले असून हत्तीच्या मार्गात आलेल्या दुचाकीला अक्षरश: फुटबॉलसारखे उडवून पायाखाली तुडविले. यात दुचाकीचे नुकसान झाले आहे. ही घटना लाखांदूर तालुक्यातील इंदोरा ते मेंढा मार्गावर घडली आहे. या घटनेचा व्हीडीओ शुक्रवारी व्हायरल झाला.
उडवली दुचाकी
चप्राड येथील सुरेश दीघोरे आपल्या मित्रासोबत हत्ती पहायला दुचाकीने गेले होते. दरम्यान, अचानक हत्तींचा कळप जवळ येत असल्याचे पाहताच दुचाकी रस्त्यावर ठेवून तरुणांनी धूम ठोकली. मात्र, त्याचवेळी कळपातील एका हत्तीने आपल्या मार्गात दुचाकी बघत दुचाकीला अक्षरश: फुटबॉलसारखे उडवून दिले, याचा व्हिडिओ आता प्रचंड वायरल होत आहे. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.
असे धाडस अंगलट
यापूर्वी 2 डिसेंबर रोजी काही अतिउत्साही आणि आगाऊ तरुणांनी गावाजवळून जाणाऱ्या रानटी हत्तींच्या कळपा जवळ धावत जात फोटो आणि व्हिडीओ काढण्याचे केलेले धाडस त्यांच्या अंगलट येता येता राहिले होते. कारण यातील एका हत्तीने या तरूणांचा काही दूर अंतरापर्यत पाठलाग केला होता. त्यावेळीही व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता.
हत्तीने केला पाठलाग
रानटी हत्तींचा कळप भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील बरडकिन्ही गावालगतच्या जंगलात थांबला होता. दुसऱ्या दिवशी हा कळप शिवनी मोगरा गावाकडून पेंढरीकडे जात असताना गावातील काही अतिउत्साही तरुणांनी हत्ती जवळ जाऊन व्हिडीओ काढण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी एका हत्तीने पाठलाग केला होता.
हत्तींच्या कळपापासून सावधान
रानटी हत्तींचा कळप चार दिवसांपूर्वी साकोलीमार्गे भंडारा जिल्ह्यात दाखल झाला होता. त्यामुळे गोंदीया जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला होता. मात्र, हा कळप सालेबर्डी तलावमार्गे रात्रीच्या सुमारास अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोंडगावदेवी वनपरिक्षेत्र क्रमांक 282 मध्ये पुन्हा परतला. सध्या खरीप हंगामातील धानाच्या कापणी आणि मळणीची कामे सुरू असल्याने शेतकरी सकाळपासून सायंकाळी उशिरापर्यंत शेतातच असतात. त्यामुळे त्यांना हत्तींच्या कळपापासून धोका होऊ नये, याची खबरदारी घेतली जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.