आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भंडारा:इंजिनिअर, एमएस्सीच्या तरुणांकडे देशी कट्टा, कट्ट्यातून गोळी झाडल्याने प्रकरण उघडकीस

nagpurएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

स्वत:जवळ असलेल्या देशी कट्ट्यातून गोळी झाडली गेल्याने एक जण जखमी झाला. उपचारासाठी डॉक्टरकडे गेल्यानंतर ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी देशी कट्ट्यासह जिवंत काडतूस बाळगणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दोन मॅगझिन, १२ जिवंत काडतूस पोलिसांनी जप्त केली आहे. जखमी आरोपीवर भंडाऱ्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन्ही आरोपी उच्चशिक्षित आहेत.

आशुतोष प्रदीप गेडाम (२५ रा. बेला) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. तर, विपिन सुधीर रामटेके (२५ रा. बोरगाव) मिथुन आसाराम दहिकर (३२), बोरगाव या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. जखमी आणि अटकेतील आरोपी हे मित्र आहेत. मिथुन इंजिनिअरिंग आणि आशुतोष व विपिन हे दोघे एमएस्सी झालेले आहेत. ही घटना ३ जानेवारी रोजी घडली. तिघेही पवनी तालुक्यातील बोरगाव ते खापा जाणाऱ्या मार्गावर उभे असताना आशुतोष गेडाम याच्या जवळील देशी कट्ट्यातून अचानक गोळी चालली. त्यामुळे गोळी त्याच्या पायाला लागल्याने तो स्वतः जखमी झाल्याने त्याला भंडारा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले असता प्रकरण समोर आले.

डॉक्टरांची दिशाभूल केली : देशी कट्ट्यातून गोळी सुटल्याने जखमी झालेल्या आशुतोषला विपिन आणि मिथुन यांनी भंडारा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना जखमेबाबत विचारणा केली असता सर्वांनी खोटी माहिती देत पडल्याने दगड लागल्याची माहिती दिली. मात्र, डॉक्टरांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली.

बातम्या आणखी आहेत...