आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूर:कोरोनावर उपचार करणाऱ्या बारावी अनुत्तीर्ण तोतया डाॅक्टरला अटक

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • नर्सिंगचेही प्रशिक्षण द्यायचा भामटा, नागपूर पाेलिसांनी केली कारवाई

कोरोनावर उपचार करणाऱ्या बारावी नापास तोतया नॅचरोपॅथी डॉक्टरला नागपूरच्या नवीन कामठी पोलिसांनी अटक केली. चंदन नरेश चौधरी (मू. रा. बिहार) असे डॉक्टरचे नाव असून तो इंटरनेटवर विविध व्याधींवरील उपचार पद्धती बघून आणि पुस्तके वाचून गरीब रुग्णांवर उपचार करत असल्याचा खुलासा झाला आहे. तसेच हा बोगस डॉक्टर नर्सिंगचे देखील प्रशिक्षण देत असल्याची माहिती पुढे आली. पोलिसांनी त्याच्या दवाखान्यातून अॅलोपॅथिक औषधांचा साठा आणि उपकरणे जप्त केली.

नवीन कामठी पोलिसांना चंदन चौधरी संदर्भात अनेक तक्रारी मिळाल्याने पोलिसांनी त्याच्यावर पाळत ठेवली. त्याच दरम्यान त्याच्या दवाखान्यात कोरोनावर उपचार करून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात रुग्णांची गर्दी होत असल्याचे दिसून येताच पोलिसांनी या धर्मार्थ दवाखान्याला भेट दिली. संचालक चंदन नरेश चौधरी याच्या जवळ वैद्यकीय व्यवसायासाठी आवश्यक महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलिंग नोंदणीकृत प्रमाणपत्र नाही, तरी देखील ताे वैद्यकीय व्यवसाय करत होता. पोलिसांनी चंदन चाैधरीविरुद्ध कलम ४२० भादंवि सहकलम ३३ महाराष्ट्र वैद्यकीय कायदा अन्वये गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे.

दवाखान्यात केले अवैधरीत्या गर्भपात
आरोपी डॉक्टरच्या दवाखान्यात मोठ्या प्रमाणात अॅलोपॅथिक औषधसाठा आणि उपकरणे मिळून आली. या दवाखान्यात अवैधरीत्या गर्भपात केले जात असल्याचा खुलासा झाला. तसेच तो लैंगिक समस्येची औषधे तयार करत होता आणि ते संबंधित जडीबुटीच्या भुकटीमध्ये मिसळून लोकांना देत होता. अपेक्षित प्रभाव दिसून येताच लोकांचा चौधरीवर विश्वास वाढत होता.

बिहारमध्ये डॉक्टरकडे होता कंपाउंडर
आरोपी डॉक्टर हा बिहार येथील रहिवासी आहे. तो अनेक वर्षांपासून नागपूर येथेच राहतो. बिहारमध्ये ताे एका डॉक्टरकडे कंपाउंडर म्हणून काम करायचा. तिथून मिळालेल्या अनुभवाचा गैरफायदा घेऊन त्याने नागपूरला धर्मार्थ दवाखाना थाटला होता. दरम्यान या व्यवसायात जोखीम जास्त असल्याने त्याने मध्यंतरीच्या काळात दवाखाना बंद करून आईस्क्रीम विक्रीचे काम सुरू केले होते. त्याच काळात आरोपीने नॅचरोपॅथीचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर त्याने पुन्हा धर्मार्थ दवाखाना सुरू केला होता. त्याच्या दवाखान्यात मोठ्या प्रमाणात गरीब रुग्ण यायचे. चंदन यूट्यूब आणि इंटरनेटच्या माध्यमातून रुग्णाला इंजेक्शन देणे, सलाइन देणे व औषधोपचार करणे शिकला होता. तसेच त्याने कोरोना रुग्णांवरही उपचार केले. परंतु, चंदन बोगस डॉक्टर असल्याची माहिती मिळताच नवीन कामठी पोलिसांनी रुग्णालयात धाड टाकून त्याला अटक केली.

बातम्या आणखी आहेत...