आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाप्पा निघाले गावाला!:ढोल - ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पाला निरोप; 390 कृत्रिम तलावात पर्यावरणपूरक गणेशाचे विसर्जन

नागपूर18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपुरात गणेश विसर्जन महापालिका, पोलिस व स्थानिक प्रशासनाने केलेल्या उत्तम नियोजनामुळे शांतता व उत्साहात पार पडले. गणेश मंडळांनी पारंपरिक उत्साहात मिरवणुकीने गणेशाला निरोप दिला. तर घरगुती गणेशाला कौटुंबिक जिव्हाळ्याने निरोप देण्यात आला. मिरवणुकीत कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आले होते. गुलाल उधळत व "पुढच्या वर्षी लवकर या' चा गजर करत भक्तांनी लाडक्या बाप्पाला निरोप दिला.

शुक्रवारी अनंत चतुर्दशीला सकाळपासून विसर्जनाला सुरूवात झाली. घरगुती गणेशाचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात आले. 4 फुटावरील गणेश मूर्तीचे विसर्जन कोराडी येथील तलावात करण्यात आले. सर्व तलाव आणि विसर्जनस्थळी स्वयंसेवी संस्था तसेच महापालिकेचे कार्यकर्ते तळ ठोकून होते. त्यांनी निर्माल्य संकलनाचे काम चोख केले.

पर्यावरणपूरक विसर्जनासाठी 390 कृत्रिम तलाव

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला चालना देण्यासाठी यंदा मनपा प्रशासनाने कृत्रिम तलावांच्या संख्येत वाढ केली होती. कुठल्याही नैसर्गिक तलावात गणेश विसर्जन करू नये, यासाठी प्रयत्न करण्यात आले. नागपूर महानगरपालिकेद्वारे गणेशमूर्ती विसर्जनासाठी शहरात झोननिहाय कृत्रिम टँक आणि फिरत्या मोबाईल कुंडांची व्यवस्था करण्यात आली होती. विसर्जनासाठी शहरातील दहाही झोन अंतर्गत 204 पेक्षा अधिक ठिकाणी 390 कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आलेली होती.

60 फूट खोल आणि 150 फूट रुंद कृत्रिम टँक

चार फुटापेक्षा जास्त उंचीच्या श्रीगणेशाच्या मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे कोराडी तलाव परिसरात व्यवस्था करण्यात आली होती. तलाव परिसरात असलेल्या 60 फूट खोल आणि 150 फूट रुंद कृत्रिम टँकमध्ये मोठ्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यासाठी 3 क्रेन सह पोकलेन आणि तीन टिप्परची व्यवस्था करण्यात आली होती. नागरिकांच्या सुविधेसाठी मनपा व पोलिस प्रशासनाचे सहायता कक्षाचे स्टॉल विसर्जनस्थळी उभारण्यात आले होते.

आपात्कालीन वैद्यकीय सेवेसाठी रुग्णवाहिका

आपात्कालीन वैद्यकीय सेवेसाठी तीन रुग्णवाहिका तयार ठेवण्यात आल्या होत्या. याशिवाय सोनेगाव आणि फुटाळा तलाव परिसरातही रुग्णवाहिका सज्ज होत्या. कोराडी आणि जवळच्या परिसरातील रहिवाशांना घरगुती आणि 4 फुटापेक्षा कमी उंचीच्या मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी कोलार नदीजवळ दोन्ही बाजूला 4 कृत्रिम विसर्जन टँकची व्यवस्था करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...