आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मादी श्वानाचे झाले सिझेरियन, 7 पिल्ले सुरक्षित:रेल्वे कर्मचारी अपर्णा रेड्डींची भूतदया अन् डॉक्टरांच्या संवेदनशीलतेने मिळाले नवजीवन

नागपूर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्याच्या काळात बहुतांश बाळंतपणे सिझेरियन होतात. प्रसूती दरम्यान जोखीम नको म्हणून गर्भवती महिलेचे सिझरिन केले जाते. हे झाले महिलांच्या बाबतीत. मात्र नागपूर येथे चक्क एका अडलेल्या मादी श्वानाचे सिझेरियन करण्यात आले. तिची सात पिल्ले सुरक्षित बाहेर काढून तिचा जीव वाचवण्यात डाॅक्टरांना यश आले आहे.

रेल्वेत काम करणाऱ्या अपर्णा रेड्डी यांनी एका भटक्या मादी श्वानाच्या पोटात अर्धवट बाळ अडकलेले पाहून तिला तत्परतेने मंगळवारी रात्री 8 वाजता पशुवैद्यकीय रुग्णालयात आणले. मादी श्वानाची अवस्था बिकट होती. परंतु शल्यचिकित्सकांनी आपले कौशल्य पणाला लावून उशिरापर्यंत शस्त्रक्रिया करून 7 पिल्ले सुरक्षितपणे बाहेर काढली.

एकच पिल्लु आले होते बाहेर

अपर्णा रेड्डी या रेल्वेमध्ये कार्यरत असून कार्यालयातून परतताना रस्त्यावरील एक भटकी मादी श्वान गर्भवती असून मागील दोन दिवसांपासून अस्वस्थ असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी आजूबाजूला चौकशी केली असता कळाले की, 2 दिवसांपासून या मादी श्वानाची प्रसूती अडली आहे. एकच पिल्लू अर्धवट बाहेर आलेले आहे. रेड्डी यांना या मादी श्वानाची अवस्था बघवली नाही. त्यामुळे त्यांनी त्वरित आपल्या भाचीच्या मदतीने रात्री 8 वाजताच्या सुमारास अलंकार चौकातील महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या पशुवैद्यक रुग्णालयात तिला आणले.

सिझेरीन करण्याचा निर्णय

महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून रात्रीच त्वरित रुग्णालयात धाव घेतली. सर्व तपासण्या करून सिझेरीन करण्याचा निर्णय घेतला. बिकट अवस्थेत असलेल्या मादी श्वानावर शल्यचिकित्सक डॉ. संदीप आखरे आणि डॉ. गौरी खंते यांच्या चमूने कौशल्य पणाला लावून उशिरापर्यंत शस्त्रक्रिया करून एकूण सात पिल्ले सुरक्षितपणे बाहेर काढली. मादी श्वान आणि पिल्लांची प्रकृती सध्या स्थिर असून ते रुग्णालयात देखरेखीखाली आहेत.

यांची झाली मोलाची मदत

माफसूचे जनसंपर्क अधिकारी डॉ. राजेश लिमसे यांनी यावेळी औषधांची मदत केली. शस्त्रक्रियेदरम्यान डॉ. रामप्रसाद मंदाडे, डॉ. सद्दाम हुसेन, डॉ. पायघन, डॉ. राहुल धोंगडे, डॉ. वरद धूत, निहाल शेख या महाविद्यालयातील पदव्युत्तरच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...