आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिफाने दिले निमंत्रण:स्लम सॉकरमधील खेळाडू शुभम पाटील याला कतारमध्ये सामना पाहण्याची सुवर्णसंधी

नागपूर11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

फुटबॉलचा महाकुंभ म्हणजेच फिफा फुटबॉल विश्वचषकाला सुरूवात झाली आहे. जगातील या सर्वात मोठ्या क्रीडा आयोजनात फिफाने नागपूरचे फुटबॉल प्रशिक्षक विजय बारसे यांची आठवण ठेवली आहे. स्लम सॉकरच्या माध्यमातून झोपडपट्टीतील मुलांना फुटबॉलपटू करण्याचे काम गेली अनेक दशके ते करीत आहेत.

अमिताभ बच्चन यांच्या "झुंड' चित्रपटाच्या माध्यमातून विजय बारसे यांची कहाणी सर्वांनी पाहिलीच आहे. आता फिफाने विजय बारसे यांच्या एका शिष्याला विश्वचषक पाहण्यासाठी थेट कतारला आमंत्रित केले आहे. स्लम सॉकरच्या माध्यमातून फुटबॉलपटू झालेला शुभम पाटील हा तरुण विजय बारसे यांच्या स्लम सॉकरचे प्रतिनिधित्व करण्यासाठी फिफा विश्वचषक पाहण्यासाठी कतारला गेला आहे.

फुटबॉल विश्वचषकाचे आयोजन करणारी फिफा श्रीमंत संघटना असली तरी फुटबॉल मुळात गरिबांचा खेळ आहे. आणि फुटबॉलचा सर्वात मोठे आयोजन करताना फिफाने स्लम सॉकर खेळणाऱ्या गरीब मुलांची आठवण ठेवली आहे. हेच आमचे यश असल्याचे मत विजय बारसे यांनी व्यक्त केले आहे. शुभम पाटील अत्यंत गरीब आणि व्यसनी वडिलांचा मुलगा असून फुटबॉलमुळे त्याचे संपूर्ण जीवनच बदलून गेले आहे. त्याच्या भरकटलेल्या आयुष्याचा गोल त्याला मिळाल्याचे बारसे याने सांगितले. फुटबॉल फक्त एक खेळच नाही तर फुटबॉलमध्ये लोकांचे जीवन घडवण्याची आणि बदलवण्याची क्षमता आहे, असे विजय बारसे यांनी सांगितले.

विजय स्टिफन बारसे यांच्या "स्लम सॉकर' या संकल्पनेने झोपडपट्टीतील मुले फूटबाॅल स्टार झाली आहे. आज यातील अनेक खेळाडू जागतिक पातळीवर खेळत आहेत. बारसे सर या मुलांच्या जीवनात आले नसते तर अंधाऱ्या वाटा तुडवण्यात त्यांचे आयुष्य संपले असते. पण, बारसे सरांचा परीस स्पर्श झाल्यानंतर या मुलांनी उजेडाची पावलांनी यशाची एकेक शिखरे काबीज केली. साहेब आमच्यासाठी बारसे सर हेच परीस आहेत. त्यांचा स्पर्श झाला नसता तर आमचे जीवनही लोखंडासारखे गंजून गेले असते अशी भावना त्यांचे शिष्य होमकांत सुरंदसे, विकास मेश्राम, शिबा मार्कस, शिवानी चौधरी, पंकज महाजन आदींनी व्यक्त केली आहे.

बातम्या आणखी आहेत...