आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वामन मेश्रामांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा:रा. स्व. संघाच्या कार्यालयावर काढलेल्या मोर्चाप्रकरणी अ‍ॅड. भगवान लोणारे यांची मागणी

नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील भोळ्या-भाभड्या आंबेडकरी जनतेची दिशाभूल करणारे भारत मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष वामन मेश्राम यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी अ‍ॅड्. भगवान लोणारे यांनी केली आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशाचे संविधान बदलण्याचा प्रयत्न करीत असल्याचा कांगावा करून आंबेडकरी जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भारत मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष वामन मेश्राम गेल्या अनेक वर्षांपासून ओरड करतात की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशाचे संविधान बदलण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु, हे वक्तव्य पूर्णपणे तथ्यहीन आणि चुकीचे आहे. आपल्या देशाच्या संविधानात संशोधन होऊ शकते. मात्र, त्यात बदल होऊ शकत नाही. ही वस्तुस्थिती असताना देखील वामन मेश्राम संघ संविधान बदणार असल्याची खोटी बतावणी करून देशातील भोळ्या- भाभड्या आंबेडकरी अनुयायांची दिशाभूल करीत आहेत.

यासंदर्भात अ‍ॅड. लोणारे यांनी तपशिलवार माहिती देताना सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या 7 न्यायमूर्तींनी आपल्या ऐतिहासीक निर्णयामध्ये स्पष्ट केले आहे की, संविधानाच्या मूलभूत माहितीत कुठलीही छेडछाड होऊ शकत नाही. असे असताना देखील वामन मेश्राम संघ संविधान बदलणार असा भ्रामक प्रचार करतात. त्यामुळे त्यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी अ‍ॅड. भगवान लोणारे यांनी केली आहे.

वामन मेश्राम यांच्य भारत मुक्ती मोर्चातर्फे गुरुवारी 6 ऑक्टोबर रोजी नागपुरातील बेझनबाग परिसरात सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेनंतर मोर्चा काढून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयावर नेण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यांच्या आंदोलनाला पोलिस विभाग आणि उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली असूनही मेश्राम यांनी मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी परिसरात कलम 144 लागू करून मेश्राम यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. या घटनाक्रमानंतर सोशल मिडीयावर गदारोळ सुरू असतानाच अ‍ॅड. लोणारे यांनी वामन मेश्राम यांच्या विरोधात पत्रक काढून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्याने आंबेडकरी आंदोलकांतील मतभेद पुढे आले आहे.

गुरुवारी पोलिसांनी संपूर्ण परिसर सील केला होता. भारताचे संविधान बदलण्याचे संघाचे कारस्थान आहे, ईव्हीएम बरोबरच पेपर ट्रेल मशिनची मोजणी न करता घोटाळे करून भाजपा निवडणुका जिंकत आहे, आरएसएस जबरदस्तीने आदीवासींचे धर्मांतरण घडवून आणीत आहे तसेच ओबीसींचे जबरदस्तीने हिंदुकरण करीत आहे, हिंदु दहशतवादाला प्रोत्साहन देण्यात येत आहे असे आरोप मोर्चेकऱ्यांचे होते.

बातम्या आणखी आहेत...