आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर मान्सून विदर्भात:हवामान विभागाची घोषणा; मुदतीआधीच दाखल झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

नागपूर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अखेर मान्सून विदर्भात दाखल झाला आहे, तशी घोषणा प्रादेशिक हवामान खात्याने गुरुवारी केली. त्यामुळे पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. विदर्भातील सर्व जिल्ह्यांत बुधवारी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. त्यामुळेच ही घोषणा करण्यात आली.

मुदतीआधीच दाखल

महाराष्ट्राच्या उर्वरित भागात मान्सूनपूर्व पाऊस सरी काेसळत असताना नागपूरसह विदर्भात अजूनही गर्मी आणि उकाडा होता. त्यामुळे वैदर्भीय पावसाची चातकासारखी वाट पाहात होते. प्रादेशिक हवामान खात्याने यापूर्वी विदर्भात येत्या दोन ते तीन दिवसांत म्हणजे १९ जूनपासून पाऊस येणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. मात्र तत्पूर्वीच मान्सून दाखल झाल्याचे जाहीर केले आहे.

वाटचाल पुढे सुरू

प्रादेशिक हवामान केंद्रानुसार नैऋत्य मान्सून उत्तर अरबी समुद्राच्या आणखी काही भागात, गुजरात राज्य, संपूर्ण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा, दक्षिण मध्य प्रदेशचा काही भाग, विदर्भाचा बहुतांश भाग, संपूर्ण तेलंगणा, दक्षिण छत्तीसगडचा काही भाग आणि दक्षिण ओडिशा, बहुतांश भागात पुढे सरकला आहे. कोस्टल आंध्र प्रदेशचा काही भाग, पश्चिममध्य आणि वायव्य बंगालच्या उपसागराचे आणखी काही भागात गुरूवार, १६ जून रोजी दाखल झाला आहे.

परिस्थिती अनुकूल

उत्तर अरबी समुद्र, गुजरात राज्य, मध्य प्रदेश, विदर्भाचा उर्वरित भाग, आंध्र प्रदेश आणि पश्चिममध्य व वायव्य बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात, छत्तीसगड आणि ओडिशाचा आणखी काही भाग, काही भागांमध्ये मान्सून पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. गंगेचा पश्चिम बंगाल, झारखंड, उप हिमालयीन पश्चिम बंगालचा उर्वरित भाग आणि बिहारचा आणखी काही भाग, पूर्व उत्तर प्रदेशचा काही भागात पुढील २-३ दिवसांत सक्रिय होईल.

बातम्या आणखी आहेत...