आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Local
 • Maharashtra
 • Nagpur
 • Fire Incident Bhandara; RTI Questions; What Is The Solution In Case Of Fire In The Hospital? Answer Of Bhandara Hospital: We Will Immediately Order Fire Brigade Of Municipal Council!

भंडारा आग दुर्घटना:माहिती अधिकारात प्रश्न; रुग्णालयात आग लागली तर काय उपाययोजना आहे? भंडारा रुग्णालयाचे उत्तर : नगर परिषदेचे अग्निशामक वाहन तत्काळ मागवू!

भंडाराएका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक
 • या बेफिकीर वृत्तीनेच घेतले १० निष्पाप बालकांचे बळी

दीप्ती राऊत, एसआयटी

फायर सेफ्टी हायड्रंट ‘उपलब्ध नाही’, फायर स्प्रिंकलर “उपलब्ध नाही’, स्मोक अलार्म “उपलब्ध नाही’ फायर एस्केप रूट व लॅडर “उपलब्ध नाही’....ही उत्तरे अाहेत भंडारा जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनाची. माहितीच्या अधिकाराखाली २४ ऑक्टोबर २०१८ रोजी विचारलेल्या एका अर्जावर ही उत्तरे रुग्णालय प्रशासनाने दिली अाहेत. इतकेच नाही तर, ‘४५० बेडच्या या रुग्णालयात कोठे आग लागली तर आपली काय उपाययोजना आहे?’ या प्रश्नावर ‘नगर परिषदेचे अग्निशामक वाहन मागवू’ असे बेजबाबदार व धक्कादायक उत्तर दिल्याचे पत्र ‘दिव्य मराठी’च्या हाती लागले आहे. या बेफिकीर वृत्तीनेच १० निष्पाप बालकांचे बळी घेतले अाहेत.

मंत्रालयाला लागलेल्या आगीनंतर फायर सेफ्टी आणि फायर ऑडिटचा विषय ऐरणीवर आला होता. त्यानंतर शासनाने लागू केलेल्या धोरणानुसार गेली पाच वर्षे भंडारा जिल्हा रुग्णालयाच्या रुग्ण कल्याण समितीच्या प्रत्येक बैठकीत हा मुद्दा चर्चेस आला होता. मात्र त्यावर कोणतीही उपाययोजना न झाल्याने विकास मदानकर या माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी १२ ऑक्टोबर २०१८ रोजी भंडारा जिल्हा रुग्णालयातील फायर सेफ्टीबाबत माहिती विचारली होती. त्यात वरील उत्तरे मिळाली होती. त्यानंतर दोन वर्षे उलटून गेल्यावरही बदल दिसला नाही म्हणून मदनकर यांनी २४ ऑक्टोबर २०२० रोजी पुन्हा हेच प्रश्न विचारले असता, रुग्णालयाच्या अग्निप्रतिबंध उपाययोजनेसाठी १ कोटी ५३ लाखांचे अंदाजपत्रक राज्य शासनाच्या आरोग्य सहसंचालकांकडे पाठवल्याचे कळवण्यात आले होते. या सर्व विलंबाच्या प्रती आरोग्य सचिवांपर्यंत पाठविण्यात येऊनही, ही दुर्घटना घडली. या गलथान कारभारास अधिकारी जबाबदार असताना त्यांना पाठीशी घालण्यासाठी डॉक्टर आणि नर्सेसचा बळी दिला जात असल्याचा आरोप भंडारा जिल्हा आयएमएच्या वतीने करण्यात आला आहे. डॉक्टर आणि नर्सेसचे काम रुग्णांवर उपचार करण्याचे आहे आणि ही दुर्घटना तांत्रिक बिघाडाची अाहे. डॉक्टर्स आणि नर्सेसच्या निलंबनाची अन्यायकारक कारवाई मागे घेण्याची मागणी महाराष्ट्र नर्सेस असोसिएशन आणि इंडियन मेडिकल असोसिएशनने महाराष्ट्र सरकारकडे केली आहे.

 • एका मंजुरीसाठी २ वर्षांची प्रतीक्षा
 • पहिला माहिती अर्ज - २४ ऑक्टोबर २०१८
 • अग्निप्रतिबंधक यंत्रणा अंदाजपत्रक- जानेवारी २०१९
 • भंडारा जिल्हा रुग्णालय ते नागपूर उपसंचालक - १० फेब्रुवारी २०२०
 • प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव - १२ मे २०२०
 • नागपूर उपसंचालक ते मुंबई सहसंचालक - १५ जून २०२०
 • माहिती अधिकारात दुसरा अर्ज - २४ जून २०२०
 • अखेरीस दुर्घटना- ९ जानेवारी २०२१
 • प्रस्ताव व निधी मंजूर - १ कोटी ५३ लाख.
बातम्या आणखी आहेत...