आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूर:बेला येथील मानस अॅग्रो इंडस्ट्रीतील बाॅयलर स्फोटात पाच जण ठार, नातेवाईकांचा मृतदेह घेण्यास नकार

नागपूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दुरूस्तीचे काम करीत असताना बायोडायजेस्टर लिक झाल्याने घडली घटना

बेला येथील मानस अॅग्रो इंडस्ट्रीतील युनिट १ मध्ये दुपारी २ वाजताच्या सुमारास झालेल्या बाॅयलर स्फोटात पाच जण ठार झाल्याने खळबळ उडाली आहे. नाशिक येथील एस. पी. इंजिनिअरिंग कंपनीला डागडुजीचे काम देण्यात आले होते. कंपनीचे कंत्राटदार प्रशांत शिंदे व सुपरवायझर संजय इंगळे यांच्याविरुद्ध भादंवि कलम २८६, २८७, ३०३ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कंपनीत केेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे चिरंजीव सारंग गडकरी हे संचालक आहेत.

बेला येथे मानस अ‍ॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड साखर कारखान्यात बायोगॅस मोलॅसिस उत्पादन टँक आहे. ही टँक ६० लाख लिटर क्षमतेची असून उसाच्या मळीपासून सेंट वॉश पदार्थ काढला जातो. त्यापासून बायोगॅस तयार केला जातो. विद्युतनिर्मितीसाठी हा बायोगॅस उपयोगी ठरतो. सहा महिन्यांपासून या ठिकाणी काम बंद होते. कारखान्यात मेंटेनन्सचे काम काही दिवसांपासून सुरू करण्यात आले. या कामाचे कंत्राट प्रशांत शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. सुपरवायझर संजय इंगळे यांच्या देखरेखीखाली काम सुरू होते. शनिवारी नेहमीप्रमाणे पाच कंत्राटी कामगार कामावर आले.

या बायोगॅस प्रकल्पात वेल्डिंगच्या माध्यमातून डागडुजीचे कार्य सुरू होते. अशातच बायोगॅसचा स्फोट झाला. पाचही कामगारांचे मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत होते. दोन कामगारांचे मृतदेह टँकच्या खाली पडले तर अन्य तीन कामगारांचे मृतदेह टँकच्या परिसरात दिसून आले. शेवटच्या टप्प्यातच काम सुरू असताना हृदय हेलावून टाकणारी ही घटना घडली. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी तसेच मृत कामगारांच्या कुटुंबीयांना मदत केली जावी, अशी वडगाव येथील नागरिकांची मागणी आहे. गॅस वेल्डिंग करताना निघालेल्या ठिणग्यांचा गॅसशी संपर्क होऊन झालेल्या स्फोटात पाच जण जागीच ठार झाले. याची बातमी वाऱ्यासारखी गावात पसरताच लोकांनी कारखान्यात गर्दी केली. या घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण होते. मृतांमध्ये मंगेश प्रभाकर नौकरकर (२१), लीलाधर वामनराव शेंडे (४७), वासुदेव विठ्ठल लडी (३०), सचिन प्रकाश वाघमारे (२४) व प्रफुल्ल पांडुरंग मून (२५, सर्व वडगाव) यांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...