आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यातील कृषी आणि कृषी संलग्न विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (वनामती) आणि प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थांमधून (रामेती) आता महिला शेतकरी, शेतकरी, शेतमजूर यांनाही कृषीविषयक कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मंगळवारी मुंबईत कृषिमंत्री दादा भूसे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्यप्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत या विषयाला मान्यता देण्यात आली.
२०२२ हे वर्ष कृषी क्षेत्रासाठी महिला वर्ष म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कृषी योजनांचा महिलांना अधिकाधिक लाभ देऊन त्यांना प्रगतीच्या दिशेने नेण्यासाठी प्रशिक्षणाचा लाभ होऊ शकतो. म्हणून त्यांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे, असे मत सर्व सहभागींनी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्यात कृषी विभागाची ७ प्रादेशिक प्रशिक्षण केंद्र असून नागपुरात राज्यस्तरीय प्रशिक्षण केंद्र आहे. त्यात १२५ कर्मचारी आहेत. या प्रशिक्षणात ५० टक्के अधिकारी व कर्मचारी आणि ५० टक्के शेतकरी व महिला शेतकऱ्यांचा समावेश राहिल. त्यातही २५ टक्के महिला व २५ टक्के पुरुष शेतकरी राहतील यावर भर देण्यात येणार आहे. कृषी अधिकारी व कर्मचारी गावात जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात. पण, अनेकदा त्यांच्या प्रमाणभाषेमुळे शेतकऱ्यांपर्यत परिणामकारकरीत्या सांगायचे ते पोहोचत नाही. याउलट त्यांच्यातीलच एखाद्या शेतकऱ्याने त्यांच्याच भाषेत समजावून सांगितले तर ते चटकन समजते, ही बाब अनेक कार्यक्रमांतून लक्षात आली. त्यातूनच चिंतन होऊन हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सध्या राज्य शासनाचा भर शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या बळकट करणे हा आहे. त्यासाठी बाजारपेठेची गरज ओळखून विकेल ते पिकेल ही संकल्पना राबवली जात आहे. त्या अनुषंगाने महिला, शेतकरी, शेतमजूर, शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी गट यांना प्रशिक्षण देऊन खऱ्या अर्थाने कृषी विस्तारातून कृषी समृद्धीची संकल्पना पुढे नेता येईल, यावर बैठकीत एकमत झाले.
२३ लाखांवर महिला शेतकरी कृषी विभागाच्या नोंदीनुसार राज्यात २३ लाख ६३ हजार ७०६ महिला शेतकरी आहे. यात विदर्भामध्ये ५,४४,५१३, मराठवाडा ६,३४,३२१, कोकण २,७१,३८६, नाशिक िवभाग ४,३८,४८४, पुणे विभागात ४,७५,०८२ महिला शेतकऱ्यांचा समावेश आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.