आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाच्या मृतदेहावर संबंधित रुग्णालयातर्फे थेट अंत्यसंस्कार केले जातात. प्लास्टिकमध्ये गुंडाळलेल्या मृतदेहावर डिझेल टाकून अथवा विद्युत शवदाहिनीत अंत्यसंस्कार केले जातात. परंतु, राज्यात चंद्रपूर येथे प्रथमच कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णावर पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार करण्यात आले. चंद्रपूर येथील अजय बहुउद्देशीय संस्थेने यासाठी पुढाकार घेतला. सुप्रसिद्ध अभिनेते व सामाजिक कार्यकर्ते सयाजी शिंदे यांचे सहकार्य व समर्थन या संस्थेला आहे. पर्यावरणपूरक अंत्यसंस्काराचे प्रणेते इको-प्रो फाउंडेशनचे अध्यक्ष विजय लिमये या वेळी उपस्थित होते.
चंद्रपूर येथील मोक्षधाममध्ये झालेले अंत्यसंस्कार प्रणिता बोरकर व स्वाती जोतकर या दोन महिलांनी केले. चंद्रपूर येथील ऊर्जानगरातील ५३ वर्षीय गृहस्थाचे शनिवारी रात्री निधन झाले होते. कोरोनाबाधित असलेल्या त्यांच्या पत्नीही उपचार घेत आहेत. मूलबाळ नसलेल्या या गृहस्थाच्या मृतदेहाला त्यांचे पुतणे ईश्वर एरमे यांनी भडाग्नी दिला. या वेळी त्यांच्या कुटुंबीयांनी अजय बहुउद्देशीय संस्थेचे मनापासून आभार मानले.
पऱ्हाटी व तुऱ्हाटीपासून तयार होते माेक्षकाष्ठ
मोक्षकाष्ठ म्हणजे शेतातील पऱ्हाटी व तुऱ्हाटीपासून २ ते ४ फुटांचे ओंडके तयार केले जाते. धनबाद, टाटानगर, जयपूर येथे गोकाष्ठाद्वारे अंत्यसंस्कार करण्यात येतात. माेक्षकाष्ठामुळे अनेकांना रोजगार प्राप्त झाला आहे. कापूस व सोयाबीन वेचल्यानंतर पऱ्हाटी वा तुऱ्हाटी जाळून टाकावी लागते. या कचऱ्याचा भुगा करून त्यापासून गोल लांब ठोकळे तयार केले जातात. एकरी सुमारे १ टन कृषी कचरा तयार होतो. तो विकून शेतकऱ्याला एकरी २ हजार फायदा होतो, असे लिमये यांनी सांगितले.
१४ हजार झाडांची थांबते कत्तल :
सुरुवातीला फक्त नागपुरात सुरू करण्यात आलेल्या पर्यावरणपूरक अंत्यसंस्काराला राज्याबाहेरही चांगला प्रतिसाद मिळत असून यामुळे वर्षाला सुमारे १८ हजार झाडांचा जीव वाचत असल्याची माहिती लिमयेंनी दिली. एका अंत्यसंस्कारासाठी दोन १५ वर्षे वयाची झाडे लागतात. सध्या मोक्षकाष्ठ, गोकाष्ठ व गोवऱ्या रचून अंत्यसंस्कार केले जातात. म्हणजे रोज शंभर झाडांची कत्तल होत नाही.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.