आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहशत:नरभक्षक वाघाला पकडण्यासाठी वन कर्मचाऱ्यांना लावली पिंजऱ्यात बसण्याची ड्युटी; वाघाने घेतले 8 नागरिकांचे बळी

नागपूर2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वाघाला गोळ्या घालण्याची चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांच्यासह परिसरातील नागरिकांची मागणी

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा परिसरातील आरटी-१ या नरभक्षक वाघासंदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा वाघ जेरबंद करण्यासाठी दबाव वाढत असताना वन कर्मचाऱ्यांना पिंजऱ्यात बसण्याची ड्यूटी लावली जात आहे. एकीकडे वाघाने आठ नागरिकांचे बळी घेतले असताना वन कर्मचाऱ्यांना प्रत्येकी आठ तास पिंजऱ्यात बसण्याची ड्यूटी लावण्यात आली. वन कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी या प्रकाराचा विरोध केला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा, विरूर वन परिक्षेत्रात नरभक्षक वाघाने गेल्या वर्षभरापासून धुमाकूळ घातला आहे. या वाघाने आठ शेतकऱ्यांना ठार केले आहे, तर दोघांना कायमचे अपंग केले आहे. वाघाला गोळ्या घाला, अशी मागणी चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांच्यासह परिसरातील लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी केली आहे.

वन विभागाने या वाघाला पकडण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. १५० च्या आसपास कॅमेरे या परिसरात लावले असून वन कर्मचाऱ्यांचे पथक दिवसरात्र नरभक्षक वाघाचा शोध घेत आहेत. मात्र, अजूनही वाघाला जेरबंद करण्यास वन विभागाला यश आले नाही. एकूण २१ गावे या वन परिक्षेत्रात येतात. गेले वर्षभर प्रयत्न करूनही हा नरभक्षक वाघ जेरबंद करण्यात वन विभाग अपयशी ठरला आहे. आता या वाघाला जवळून बेशुद्धीचे इंजेक्शन देण्यासाठी वन कर्मचाऱ्यांना पिंजऱ्यातच दुसऱ्या टोकाला बसवले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासाठी वन कर्मचाऱ्यांच्या तीन शिफ्टमध्ये ड्यूटी लावण्यात आली आहे.

वन खात्याला नवीन नाही, डार्ट मारण्यासाठी आवश्यक

गैरसमजातून वस्तुस्थिती समजून न घेता बातमी पसरली आहे. वन खात्याला हे नवीन नाही. वाघाला जवळून डार्ट मारण्यासाठी एका विशेष पिंजऱ्यात सुरक्षेची पूर्ण खबरदारी घेऊन प्रशिक्षित कर्मचारी बसतात, अशी माहिती चंद्रपूरचे सीसीएफ एन. आर. प्रवीण यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली. जंगलात लागलेली आग विझविण्यासाठी फायर फायटर आग प्रतिबंधक गणवेश घालून आग विझवितात. तसेच हे आहे. मचाणावरून डार्ट मारू शकत नाही. त्यात चुकण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे एक पशुवैद्यकीय अधिकारी व एक शूटर पिंजऱ्यात बसून डार्ट मारतात. यात वाघ वा वन्य प्राणी पिंजऱ्याजवळ आला तरी धोका नाही. यापूर्वीही अशा प्रकारे नरभक्षक वाघाला बेशुद्ध करण्यात आले होते, असे एन. आर. प्रवीण यांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...