आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतात ओमायक्रॉनची तिसरी लाट असतानाच सर्वसाधारणपणे १०० पैकी ७५ जणांना “बीए.२’ या नव्या व्हेरिएंटची लागण होऊन गेलेली आहे, असे सांगतानाच चीनमध्ये महिनाभरानंतर स्थिती स्पष्ट झाल्यानंतरच नेमके सांगता येईल. भारताला सध्या तरी चौथ्या लाटेचा धोका दिसत नाही, अशी माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या साथीचे आणि संसर्गजन्य रोग विभागाचे माजी प्रमुख पद्मश्री डाॅ. रमण गंगाखेडकर यांनी “दिव्य मराठी’शी बोलताना दिली. सध्या १५० कोटी लोकसंख्येच्या चीनमध्ये नव्या व्हेरिएंटमुळे दोन मृत्यू झाले असून सुमारे पाच हजार रुग्ण आहेत. आपल्याला चीनमधील परिस्थितीवर लक्ष ठेवून राहावे लागेल. महिनाभरानंतर चीनमधील नेमकी परिस्थिती स्पष्ट होईल. चीनमधील परिस्थिती हाताबाहेर गेल्यास आपल्याला काळजी करण्याची परिस्थिती राहील, असे गंगाखेडकर यांनी स्पष्ट केले.
ऐकीव माहितीवर वा अफवांवर विश्वास न ठेवता उगाच पॅनिक होण्याची अजिबात गरज नाही. लोकांनी घाबरून न जाता तसेच दिरंगाई न करता वेगाने लसीकरण करून कोरोना नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहनही गंगाखेडकर यांनी केले. वुहान विषाणूनंतर डी-६१४ विषाणू आला. त्याचा सर्वत्र संसर्ग झाला. त्या नंतर अल्फा, बीटा व डेल्टा विषाणू आला. दर चार-सहा महिन्यांनी एक कुठला तरी नवीन म्यूटंट येणारच आहे. आपण काळजी घेणे हाच एकमेव उपाय आहे, असे ते म्हणाले.
तिसरी लाट जवळपास ओसरली, तरीही बेफिकिरी नकाे
चीनने झीरो कोरोना ट्रान्समिशन पाॅलिसी लावली होती. आपल्याकडे संसर्ग असलेला परिसर तेवढा सील करीत होते. जगभर जहाज, विमान वाहतूक सुरू असते. त्यामुळे संसर्ग पसरू न देणे सध्याच्या घडीला कठीण आहे. हे लक्षात घेता प्रत्येकाने काळजी घेणे हेच चांगले, असे गंगाखेडकर यांनी सांगितले.
पद्मश्री डाॅ. रमण गंगाखेडकर यांचे मत
संसर्गामुळे इम्युनिटी ९ ते १२ महिने राहू शकते. भारतीयांना त्याचे संरक्षण आहे. “हायब्रिड इम्युनिटी’ रुग्णालयात भरती होणे कमी करते. तसेच तीव्र काेरोना आजार व मृत्यूची शक्यता कमी करते. ओमायक्रॉनमध्ये हे दिसून आले. भारतातून तिसरी लाट ओसरली आहे. तरीही बेफिकीर राहाता कामा नये, असे गंगाखेडकर म्हणाले.
देशात ओमायक्रॉन वेळी बीए.२ व्हेरिएंट होता
चीनसह जर्मनी, दक्षिण कोरिया, व्हिएतनाम आदी देशांत “बीए.२’ या नव्या व्हेरिएंटची लाट आहे. भारतात ओमायक्रॉन असताना १०० पैकी ७५ च्या वर लोकांना “बीए.२’ या व्हेरिएंटची लागण झाली होती. ८८ टक्के लोकांचा दुसरा डोस पूर्ण झालेला आहे. दोन्ही डोस घेतल्यानंतरही अनेकांना ओमायक्रॉनची लागण झालेली होती. त्यामुळे आपल्याकडे व्हॅक्सिन व संसर्गाची “हायब्रिड इम्युनिटी’ विकसित झालेली आहे, असे डाॅ. गंगाखेडकर यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.