आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंडे पॉझिटिव्ह:लसीकरणाविषयी अफवांविरुद्ध सरपंच तरुणीचा लढा; बाइकवर फिरून केला लसीकरणाचा विक्रम

गणेश सिरसे / मंदार जोशी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नक्षलग्रस्त भागातील मुर्गभुशीची प्रेरणादायी कथा

दाट जंगलात वसलेले मुर्गभुशी गाव. महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमेवरील नक्षलग्रस्त परिसरातील या गावात “लस घेतली की आजारी पडतो आणि दवाखान्यात गेलो की किडनी काढून घेतात’ अशी आदिवासींमधील भ्रामक समजूत होती. ती दूर करत आपल्या बाइकवरून पाड्यापाड्यांवर फिरत लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा विक्रम या गावच्या तरुण सरपंच भाग्यश्री लेखमी यांनी केला आहे.

उपराजधानी नागपूरपासून ३५५ किलोमीटरवर हे गाव आहे. २००६ पर्यंत गावात सरपंच नव्हते. नक्षलींच्या दबावामुळे एकही योजना नव्हती. ग्रामपंचायतीच्या हद्दीतील शेवटचा पाडा मुर्गभुशी. तेथून छत्तीसगडचे जंगल सुरू होते. आई अंगणवाडी सेविका आणि वडील शिक्षक यामुळे भाग्यश्रीला लहानपणापासूनच सार्वजनिक कामाची आवड. आपल्या लोकांसाठी काम करण्यासाठी तिची ही धडपड कोरोनाविरोधातील लढाईतही उपयोगी ठरली. विशेष म्हणजे आईवडिलांनी वाढवताना पेरलेला आत्मविश्वास हेच तिचं भांडवल.

अर्धनग्न आदिवासी, ४० ते ५० घरांचे पाडे, अति दुर्गम आणि अति संवेदनशीलही. या ठिकाणी वीज नाही, पण कोरोनाची लस मात्र पोहोचली आहे. परंतु लस घेतल्यावर माणसं आजारी पडतात आणि दवाखान्यात गेल्यावर किडनी काढून घेतात हा गैरसमज दूर करण्यासाठी लोकांशी संवाद साधत ज्येष्ठ नागरिकांचे १०० टक्के लसीकरण पूर्ण करण्याचे श्रेय सरपंच भाग्यश्री, आरोग्य कर्मचारी आणि लोकबिरादरी प्रकल्पाचे कार्यकर्ते यांना जाते. सरपंच भाग्यश्री आपल्याच बाइकवरून गावकऱ्यांना लसीकरणासाठी घेऊन जाते. त्याशिवाय लोकबिरादरी प्रकल्पाच्या ४० स्वयंसेवकांची फौज या लढाईत विशेष मेहनत घेते आहे. भामरागडच्या या दाट जंगलात अजून कोरोनाचा मोठा संसर्ग झालेला नाही. काही रुग्ण निघाले होते, पण ते होम आयसोलेशमधील उपचारांनी बरे झाले.

लोकबिरादरीचे समुपदेशन
हेमलकसा येथे प्रकाश आमटे यांनी सुरू केलेले लोकबिरादरी रुग्णालय आहे. येथील डॉक्टर आणि कर्मचारी चाचणी, लसीकरण आणि कोरोना उपचार यासाठी दिवसरात्र परिश्रम घेत आहेत. समुपदेशनासाठी खास व्हिडीयो तयार करण्यात आले आहेत. डॉ. दिगंत आमटे, अनघा आमटे, प्राजक्ता जोशी यांच्या नेतृत्वाखाली ४० स्वयंसेवकांची टीम परिश्रम घेत आहे. लोकांमध्ये गैरसमज खूप आहेत, पण लोकबिरादरीबद्दल विश्वासही. लोकबिरादरीचे स्वयंसेवक लसीकरणासाठी पुढाकार घेत असल्यामुळे काम सोपे झाले आहे.

लोकांमध्ये विश्वास निर्माण करणे गरजेचे
लोकांना लसीकरणाबाबत अनेक गैरसमज अाहेत. मला सगळे गावची लेक मानतात, बहीण म्हणतात. त्यामुळे हे शक्य झाले. यात लोकबिरादरी आणि अरोग्य विभागाचे सहकार्य मिळाले. - भाग्यश्री लेखामी, सरपंच, कोठी ग्रामपंचायत

स्थानिक भाषेत व्हिडिओ तयार केले
कोरोना रुग्ण काही दिवसांपूर्वी वाढत होते. ते रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. जनजागृतीसाठी येथील आदिवासी भाषेत व्हिडिओ तयार करण्यात आले. यातून लोकांमधील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. - डाॅ. दिगंत आमटे, लोकबिरादरी रुग्णालय.

वीज नाही, पण लस आली
स्वातंत्र्यानंतर अजून येथे वीज आली नाही. गावात विजेचे खांब आले, ताराही बसवल्या. मात्र, अजूनही घरांमध्ये अंधार आहे. काही वस्त्यांमध्ये ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने बाबा ठक्कर वस्ती सुधार योजनेतून नळ, सौरऊर्जा पोहोचली आहे. अजूनही शाळा, आरोग्य केंद्र, रस्ते नाहीत. परंतु या महामारीविरुद्ध लढणारी लस मात्र सहजपणे पोहोचली आहे.

बातम्या आणखी आहेत...