आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुस्लीम कुटुंबात उत्साहात साजरा होतो गणेशोत्सव:मुलाच्या हट्टासाठी दहा वर्षांपासून होते गणेशस्थापना; खान कुटुंबाची बाप्पावर श्रद्धा

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गणपतीच्या आगमनापासून सुरू झालेला गणेशोत्सवाचा उत्साह सर्वत्र ओसंडून वाहात आहे. सायंकाळी आपल्या शहरातील गणेश दर्शनासाठी लोक सहकुटुंब बाहेर पडतात. बाजारपेठेतही उत्साहाचे वातावरण आहे. गणपती ही सर्वांना आवडणारी देवता आहे. नागपुरातील खान कुटुंबीय दरवर्षी गणेशोत्सव साजरा करते. त्यांचा हा गणपती औत्सुक्याचा विषय झाला आहे.

गणेशोत्सव कोणत्याही जाती-धर्मापुरता मर्यादित राहिलेला नाही. सर्वधर्मीय आवडीने त्यात सहभागी होतात. गणेशोत्सव म्हणजे जाती आणि धर्म व्यवस्थेच्या पलीकडे जाऊन माणसांना माणसांशी जोडणारा दुवा ठरतो आहे. याचे ताजे जिवंत उदाहरण नागपुरात पाहायला मिळते. 18 वर्षीय सिझेन सोहेल खान हा गेल्या दहा वर्षांपासून त्याच्या घरी गणेशोत्सव साजरा करतो. सिझेनचे अम्मी आणि अब्बू देखील गणेशोत्सवाचे दहा दिवस गणेशोत्सवात रंगून जातात.

गणेशाची आरती तोंडपाठ

संपूर्ण हिंदू पद्धतीने रोज सकाळ संध्याकाळची आरती केली जाते. एवढेच नाही तर संपूर्ण कुटुंबाला गणेशाची आरती तोंडपाठ झाली आहे. खान कुटुंबाची इतकी भक्ती आणि श्रद्धा गणपती बाप्पावर आहे, की सर्वधर्म एक असल्याचा संदेश देणारा गणपती म्हणून परिसरातील नागरिक आवर्जून दर्शनासाठी येतात.

असा सुरू झाला गणेशोत्सव

सिझेन अगदी लहान असतानापासून मित्रांच्या घरी गणेशोत्सवात सहभागी व्हायचा. तेव्हा पासूनच आपल्या घरी देखील गणपती बाप्पाचे आगमन व्हावे अशी त्याची इच्छा होत होती. सिझेन खान हा 5 वर्षांचा असेल तेव्हा त्याने घरी मातीची गणेशमूर्ती तयार करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याची बाल लिला बघून सिझेनच्या अम्मी अबूंना आश्चर्य वाटले. मात्र, तो लहान असल्याने त्याकडे सर्वांनी दुर्लक्ष केले. परंतु दरवर्षी घरी बाप्पाची मूर्ती तयार करू लागला तेव्हा सिझेनमध्ये असलेली प्रचंड गणेशभक्ती आल्याचा साक्षात्कार सर्वांना झाला. त्यानंतर गेल्या दहा वर्षांपासून सिझेनच्या घरी वाजत गाजत गणपती स्थापना केली जाते. संपूर्ण दहा दिवस खान कुटुंबीय बाप्पाची मनोभावे सेवा करतात.

गणेशा सर्वधर्मसमभावाचा प्रतीक

आपला भारत देश विविध प्रकारची संस्कृती, सण उत्सव आणि परंपरेने नटलेला आहे. संपूर्ण जगात आपला देशात सर्व धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहातात. एवढेच नाही तर सर्व धर्मियांच्या सण उत्सवात सहभागी होतात. सिझेन खानने सुरू केलेली गणेशोत्सवाची परंपरा देखील आपल्या जगावेगळ्या संस्कृतीचा भाग ठरली आहे. म्हणूनच सिझेनच्या मते त्याचा बाप्पा सर्वधर्मसमभावाचा प्रतीक आहे.

बातम्या आणखी आहेत...