आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नितीन गडकरींच्या घरी बाप्पाचे आगमन:नागपुरात धूमधडाक्यात साजरा होणार गणेशोत्सव, निर्माल्य संकलनासाठी मनपाचा रथ

नागपूर | अतुल पेठकर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरु आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरीही गणपती बाप्पाचे आगमन होत आहे. गडकरींच्या पत्नी कांचन गडकरी कुटुंबीयांसह गणपती घेऊन घरी जातांना दिसून आल्या.

31 ऑगस्टपासून गणेशोत्सवास सुरूवात होत आहे. नागपूर शहरात पर्यावरणपूरकरित्या साजरा व्हावा यासाठी नागपूर महानगरपालिका प्रशासनाद्वारे आवश्यक ते सर्व कार्य करण्यात येत आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात प्रचंड उत्साहात गणरायाचे आगमन होत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी गणेशोत्सवाची मोठी परंपरा आहे. दरवर्षी गडकरी कुटुंब मोठ्या उत्साहात हा उत्सव साजरा करतात. यंदा देखील बाप्पाच्या आगमनापूर्वी 1 दिवस आधीच बाप्पाला आणण्यात आले.

निर्माल्य रथाचे लोकार्पण

नागपूरात गणेश मंडळ आणि घरगुती गणपतींचे निर्माल्य संकलन करण्यासाठी मनपाद्वारे ‘निर्माल्य रथ’ची व्यवस्था करण्यात आली आहे. मनपाच्या दहाही झोनमध्ये प्रत्येकी एक रथाची व्यवस्था असून मंगळवारी (30 ऑगस्ट) मनपा मुख्यालयातील प्रशासकीय इमारत परिसरात मनपा आयुक्त तथा प्रशासक आणि जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांनी हिरवी झेंडी दाखवून निर्माल्य रथाचे लोकार्पण केले.

याप्रसंगी मनपाचे अतिरिक्त आयुक्त दीपककुमार मीना, राम जोशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त तथा संचालक डॉ. गजेंद्र महल्ले आदी उपस्थित होते.

एजी एन्व्हायरो आणि बीव्हीजी

नागपूर शहरातील स्वच्छतेच्या कार्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या एजी एन्व्हायरो आणि बीव्हीजी या दोन्ही कंपन्यांनी निर्माल्य रथाद्वारे निर्माल्य संकलनाची जबाबदारी स्वीकारली आहे. यासाठी विशेष वाहनाची व्यवस्था करण्यात आली असून संकलित करण्यात आलेल्या निर्माल्यापासून खत निर्मिती केली जाणार आहे.

निर्माल्य रथ लोकार्पणप्रसंगी मनपा आयुक्त आणि जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर म्हणाले, गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे नागरिकांना सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करता आला नाही. यंदा कुठलेही निर्बंध नसल्याने, लोकांमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह व्दिगुणीत झाला आहे. त्यामुळे मनपा प्रशासनानेही गणेशोत्सवात लोकांना पुरेशा सेवा पुरविण्यावर अधिक भर दिला आहे.

निर्माल्य संकलन बॅग

झोननिहाय 10 निर्माल्य रथांमध्ये, प्रत्येकी 10 निर्माल्य संकलन बॅग ठेवण्यात आल्या आहेत. एका बॅगमध्ये सुमारे चारशे किलो निर्माल्य संकलीत करण्याची क्षमता आहे. बॅगमध्ये निर्माल्य संकलित करून ते निर्माल्य रथामार्फत पुढील प्रक्रियेसाठी नेले जाणार आहे. नागरिकांनी निर्माल्य संकलन कार्यात सहकार्य करावे असे आवाहन उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले यांनी केले.

10 झोनमध्ये दिवसभर फिरणार निर्माल्य रथ

शहरातील, लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, धंतोली, नेहरूनगर, गांधीबाग, सतरंजीपुरा, लकडगंज, आशीनगर, मंगळवारी या दहाही झोनमध्ये दिवसभर निर्माल्य रथ फिरणार आहेत. रोज संकलित केलेले निर्माल्य त्याच दिवशी कंपोस्टींगसाठी भांडेवाडी प्रकल्पात सोडले जाणार आहे.

निर्माल्यापासून खत निर्मिती

2019 मधील गणेशोत्सवात, नागपूर महानगरपालिकेने शहरातून, सुमारे 150 मॅट्रीक्स टन निर्माल्य संकलीत केले होते. यंदा सुमारे तीनशे मेट्रीक टन निर्माल्य संकलीत होण्याची शक्यता आहे. जमा झालेल्या निर्माल्य भांडेवाडी येथील कंपोस्टींग प्लॅंटमध्ये खत निर्मीती करण्यात येणार आहे.

निर्माल्यापासून तयार झालेल्या या खताचा वापर मनपाच्या सर्व सार्वजनिक उद्यानात केला जाईल, अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त तथा संचालक डॉ. गजेंद्र महल्ले यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...