आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचंद्रपूर जिल्ह्यातील मुल तालुक्यात मानव-वन्यजीव संघर्ष वाढले असून एका वर्षात शेतकरी, शेतमजूर अशा एकूण १५ जणांवर वाघाने हल्ला करून ठार केले आहे. त्यामुळे जंगलालगत शेती असलेल्या शेतकऱ्यांमध्ये दहशत पसरली असून त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे वाघांच्या दहशतीत वावरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतिवर्षी एकरी ५० हजार रुपयाची मदत द्यावी व वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी मुल तालुक्यातील सरपंचांच्या शिष्टमंडळाने उप वनसंरक्षक गुरू प्रसाद यांची भेट घेऊन केली आहे.
मुल तालुक्यातील मारोडा, करवन, काटवन, उश्राळा, भादुर्णी, पडझरी, मोरवाही, कोसंबी आणि चिंचोली ही गावे वन विभागाच्या बफर झोन मध्ये समाविष्ट असुन बहुतांश शेती जंगलालगत आहे. शेतीची मशागत आणि गुरे चारण्यासाठी दररोज शेतात ये-जा करावी लागते. मात्र, मागील सात महिन्यात वाघाचे हल्ले वाढले असून पडझरी येथील प्रमोद मोहुर्ले, मारोडा येथील मनोहर प्रधाने व गजानन गुरनुले, करवन येथील रमेश वेलादी व रामभाऊ मरापे, कोसंबी येथील ज्ञानेश्वरी मोहुर्ले, चिंचोली येथील राजेंद्र ठाकरे, मोरवाही येथील सरिता पाल आणि भादुर्णी येथील खुशाल सोनुले या शेतकऱ्यांसह १५ नागरिकांवर हल्ला करून ठार केले. तसेच ४० ते ५० गुरांचा बळी घेतला. यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये वाघाची दहशत पसरली असून शेतात जाणे कठीण झाले आहे.
त्यामुळे वन विभागाने या परिसरात वावरत असलेल्या वाघांचा त्वरित बंदोबस्त करून शेतकऱ्यांना प्रतिवर्षी एकरी ५० हजार रुपयाची आर्थिक मदत द्यावी, अन्यथा शेतकऱ्यांच्या सहकार्याने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला वन विभागाने रोजगार द्यावा, आर्थिक मदतीपासून वंचित कुटुंबाला सात दिवसाच्या आत मदत देण्यात यावी आणि वाघांच्या बंदोबस्तासाठी त्वरित उपाय योजना करावी. अशी मागणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे नेतृत्वात संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे तालुकाध्यक्ष राकेश रत्नावार, काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष अशोक पुल्लावार, काँग्रेसचे शहर सचिव सुरेश फुलझेले, उपाध्यक्ष संदीप मोहबे यांनी उपवन संरक्षक गुरू प्रसाद यांच्याकडे केली. वाघाच्या हल्ल्यामध्ये ब्रह्मपुरीतील शेतकऱ्याचा मृत्यू
शेतावर काम करत असताना एका शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील हळदा येथे मंगळवारी घडली. देविदास कामडी असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. रविवारी हळदा येथील राजेंद्र कामडी जंगलात काटे तोडण्यासाठी गेला असता त्याच्यावर वाघाने हल्ला केला. यामध्ये राजेंद्र यांचा जागीच मृत्यू झाला. तर मंगळवारी शेतावर काम करत असताना हळदा गावातीलच देविदास कामडी (४८) यांच्यावर वाघाने हल्ला करीत ठार केले. २ दिवसात हळदा येथे दोघांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने गावकरी संतप्त झाले असून तात्काळ ‘त्या’ वाघाचा बंदोबस्त करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा हळदावासीयांनी दिला आहे.
शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी वन विभागाची दोन पथके
वाघापासून शेतकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी वन विभागाने वाघ पकडण्याची मोहीम हाती घेतली असून वन विभागाचे दोन तज्ञ पथक परिसरात सक्रिय झाले आहेत. लवकरच वाघ पिंजराबंद होईल, असा विश्वास आहे. - घनश्याम नायगमकर, वनपरिक्षेत्र अधिकारी, मूल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.