आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आव्हान:राहुल गांधी यांना एसी देतो, एक दिवस काेठडीत राहावे; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे थेट आव्हान

नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्यांना या देशाचा इतिहास आणि वर्तमान माहिती नाही, ज्यांना स्वत:ला आणि त्यांच्या पक्षालाही भविष्य राहिलेले नाही असे लोक सावरकरांवर टीका करतात तेव्हा आश्चर्य वाटते, असे सांगतानाच सावरकर राहिले त्या कोठडीत वाटल्यास एसी लावून देतो. राहुल गांधींनी फक्त एक दिवस त्या कोठडीत राहून दाखवावे, असे थेट आव्हान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींना दिले.

येथे आयोजित स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेच्या समारोप कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. शंकरनगर चौकात सावरकरांच्या पुतळ्याजवळ आयोजित कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. राहुल गांधी तुम्हाला ज्यांच्यासोबत जायचे असेल त्यांच्यासोबत जा. पण, आम्ही हिंदुत्व सोडणार नाही. तुम्ही जेव्हा-जेव्हा वीर सावरकरांचा अपमान कराल, तेव्हा तेव्हा जनता अशीच रस्त्यावर उतरेल आणि तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल, असे फडणवीस म्हणाले. सुधांशू त्रिवेदी म्हणाले, सावरकरांचे मोठेपण महात्मा गांधी यांना समजले. पण, आजच्या गांधींना समजत नाही. सावरकर हे चतुर, साहसी व देशभक्त आहेत. ब्रिटिशांचा कुटिलपणा सावरकरांनी माझ्याआधी ओळखला होता, असे महात्मा गांधींनी सांगितले होते.

सावरकरांमुळे प्रेरणा
तुम्ही म्हणता, मी सावरकर नाही. पण, तुम्ही सावरकर नाही आणि तुम्ही गांधीही नाही. सावरकर तुम्ही होऊ शकत नाही. इंग्लंडच्या राणीची मर्जी होईल, तेव्हा स्वातंत्र्य मिळेल, अशी धारणा होती. स्वातंत्र्य आम्हाला भिकेत नको होते. त्यामुळे सशस्त्र क्रांती झाली. वीर सावरकर यांनी १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामावर पुस्तक लिहिले. त्याने लाखो क्रांतिकारकांना प्रेरणा दिली. १८५७ चा स्वातंत्र्यसंग्राम हाच पहिला लढा होता हे सावरकरांमुळे माहिती झाले, असे ते म्हणाले.