आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नक्षलींच्या झंकार त्रैमासिकात वीरा साथीदारांवर गौरवपूर्ण लेख:पोलिस म्हणाले - लेखामुळे शहरी नक्षलवादाचा बुरखा स्वतःच फाडला

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नक्षलवाद्यांचे मुखपत्र मानल्या जाणाऱ्या 'झंकार' या त्रैमासिकातील वीरा साथीदार यांच्यावरील लेखामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. कारण झंकार मासिकात पोलिसांसोबतच्या चकमकीत मारल्या गेलेल्या नर्मदा अक्का आणि इतर अनेक जहाल नक्षलींना लेखांच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहून जोहार (क्रांतिकारी ) सलाम दिले गेले असताना वीरा साथीदार यांच्याबद्दल असलेल्या लेखाने पोलिसांनाही प्रश्न पडला आहे. महाराष्ट्र पोलिसातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नक्षलींच्या मुखपत्रात वीरा साथीदार यांच्यावरील लेखावर तीव्र प्रतिक्रिया देत नक्षलवाद्यांच्या मुखपत्रानेच शहरी नक्षलवादाचा खरा चेहरा समोर आणल्याचे मत व्यक्त केले आहे.

वीरा साथीदार हे नाव 'कोर्ट' या गाजलेल्या चित्रपटामुळे महाराष्ट्रभर माहित झाले. ते तसेच सामाजिक, कला सांस्कृतिक कार्याबद्दल ओळखले जात होते. मात्र, नक्षलवाद्यांच्या मुखपत्रातील लेखात वीरा साथीदार यांना नक्षलवाद्यांच्या केंद्रीय कमिटीचे सदस्य आणि जहाल नक्षलवादी मिलिंद तेलतुंबडे यांचा राजकीय मित्र सांगतानाच नक्षल चळवळीतील सहकाऱ्यांनी त्यांच्या कार्यापासून प्रेरित होऊन क्रांतीचे बिगुल फुंकले पाहिजे असे आवाहन करण्यात आले आहे. वीरा साथीदार यांना त्यांच्या कार्याबद्दल क्रांतिकारी संघर्षातील सर्व सहकारी कॉमरेड्सनी मिळून क्रांतिकारी जोहार केले पाहिजे असे आवाहन ही करण्यात आले आहे.

'झंकार' मासिकातील या लेखानंतर महाराष्ट्र पोलिसांच्या नक्षल विरोधी अभियानाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या लेखामुळे शहरी नक्षलवादाचा खरा चेहरा समोर आल्याची प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही आधीपासूनच शहरी नक्षलवादाचा खरा चेहरा सर्वांसमोर आणण्याचे प्रयत्न करीत असून वीरा साथीदार त्यापैकीच एक होते असे मत नक्षलविरोधी अभियानाचे उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी व्यक्त केले.

नक्षलवाद्यांच्या दोन शाखा काम करीत असून एक शाखा 'पीएलजीए' म्हणजेच जंगलात बंदुकीच्या माध्यमातून पोलिस आणि सुरक्षा दलाच्या विरोधात कारवाया करणारे आहे. तर दुसरी "युनायटेड फ्रंट' ही शाखा शहरी भागात राहून नक्षल चळवळीकडे नव्या तरुणांना आकर्षित करण्याचे तसेच शहरी भागातील वेगवेगळ्या घटकांमध्ये लोकशाही आणि राज्यघटनेविरोधात असंतोष पेरण्याचे काम करते. नक्षलवाद्यांच्या मासिकात असे लेख छापून आल्यामुळे शहरी नक्षलवादाचा बुरखा स्वतःच फाडला गेला आहे असे मत उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी व्यक्त केले आहे.

बातम्या आणखी आहेत...