आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाप्पाच्या आगमनाची तयारी:नागपुरात स्थापन होणार ‘गोमय गणेश’; बुटीबोरीत उभारणार निवासी कार्यशाळा

अतुल पेठकर | नागपूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • श्रींची मूर्ती घेण्यासाठी प्रत्येकाला बाजारात जाणे जमणार नाही हे लक्षात घेऊन राबवला उपक्रम

गणेशोत्सव म्हणजे चैतन्याचे, आनंदाचे अन् उत्साहाचे पर्व. यंदा या उत्सवावर कोरोनाचे सावट असले तरी प्रत्येक जण तितक्याच भक्तिभावाने गणेशाची आराधना करणार इतके निश्चित. मात्र, प्रत्येकाला गणेशमूर्ती घेण्यासाठी बाजारपेठेत भटकणे यंदा हवे तसे जमणारे नाही. याच अनुषंगाने ग्रामायण प्रतिष्ठान व निसर्ग विज्ञान मंडळाने संयुक्तपणे गोमय गणेशमूर्ती निर्मितीची प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली होती. त्यात निर्मित गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात येणार असल्याची माहिती निसर्ग विज्ञान मंडळाचे विजय घुगे व ग्रामायण प्रतिष्ठानचे अनिल सांबरे यांनी दिली. या कार्यशाळेत सुमारे १० ते १५ मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत.

आजच्या घडीला बाजारपेठेत मिळणाऱ्या बहुतांश गणेशमूर्ती मातीच्या असल्याचे सांगून विकल्या जातात. मात्र, विसर्जनानंतरच त्यातील सत्यता कळते. शिवाय अशा मूर्तीची उत्सवमूर्ती म्हणून स्थापना शास्त्रसंमत नाही.“गोमय वसते लक्ष्मी’ असे म्हणतात. गायीपासून मिळणारी प्रत्येक गोष्ट ही मानवी जीवन सुकर करण्यासाठी लाभदायक आहे. म्हणूनच आपल्या देशात गायीला माता म्हणून मान मिळतो तो यामुळेच. गायीचे शेण, गोमूत्र आदी पंचगव्य हे अनेक दृष्टीने लाभदायक आहे. या गोमयापासून विविध वस्तू तयार करण्याचा प्रयत्न अनेकांकडून केला जात आहे. सध्या सुरू असलेला कोरोनाचा प्रकोप बघता अस्सल मातीची गणेशमूर्ती शोधणे सामान्य माणसाला जरासे अवघड आहे. म्हणून घरीच गणेशमूर्ती तयार करून त्याची प्रतिष्ठापना करण्याचे व उत्सवानंतर ती घरीच विसर्जित करण्याचे आवाहन ग्रामायण प्रतिष्ठानचे अनिल सांबरे यांनी केले आहे.

ऑनलाइन कार्यशाळांचे आयोजन

निसर्ग विज्ञान मंडळाने सर्वसामान्यांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी कार्यशाळांचे आयोजन केले आहे. ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या या कार्यशाळेत आजवर दीडशे कुटुंबांनी सहभाग नोंदवला असून याअंतर्गत तीन ते बारा इंंचांच्या गोमय गणेशमूर्ती तयार करण्याचे निःशुल्क प्रशिक्षण देण्यात आले. विशेष म्हणजे अशा प्रकारे सामान्यांनाही प्रशिक्षण मंडळातर्फे देण्यात येणार आहे. इच्छुकांनी ७७०९००३६७३ व ९४२२८०१९६१ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन विजय घुगे यांनी केले आहे. महेश बोकडे, दीपक शाहू, लक्ष्मी मेहर, अश्विनी बुजवणे, ज्योती कापकर व विनय पांडे या सदस्यांचा यात मोलाचा सहभाग आहे.

बुटीबोरीत लवकरच गोमय वस्तू निर्मिती कार्यशाळा उभारणार

नागपूरपासून ४० किमीवरील बुटीबोरी एमआयडीसीत लवकरच गोमय वस्तू निर्मितीची कार्यशाळा उभारण्यात येणार असून तिथे चार ते पाच मशीन लावण्यात येणार आहेत. त्याद्वारे गोमय कुंड्या, पणत्या तसेच मूर्ती तयार करण्यात येणार आहेत. दिवाळीत पूजेसाठी लागणाऱ्या महालक्ष्मीच्या मूर्तीही तयार करण्यात येणार आहे. भारतीयांना स्वदेशी वस्तू रास्त भावात उपलब्ध करून देणार असल्याचे सांबरे यांनी सांगितले.

अशी घडते पर्यावरणपूरक गाेमय गणेशमूर्ती

गोमय गणेशमूर्ती तयार करताना गाईचे शेण, गोमूत्र व शाडूची माती हे मुख्य घटक असतात. तसेच दूध, तूप, मुलतानी माती, गेरू, काजळी, नीळ, हळद, कुंकू यांचाही उपयोग मूर्ती घडवताना करण्यात येताे. गाेमय गणेशमूर्ती या प्लॅस्टर अाॅफ पॅरिसला चांगला पर्याय असून या मूर्ती पर्यावरणपूरक असतात.

बातम्या आणखी आहेत...