आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंधरा वर्षे पूर्ण झालेल्या सरकारी गाड्या भंगारात निघणार:केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नागपूरमध्ये घोषणा

नागपूर2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंधरा वर्षे पूर्ण झालेल्या केंद्र सरकारच्या गाड्या भंगारात निघणार असल्याची माहिती अ‍ॅग्रो व्हिजन प्रदर्शनीच्या उद्घाटन कार्यक्रमात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी येथे दिली.

अमरावती रोडवरील दाभा येथील पीडीकेव्ही मैदानावर आयोजित अ‍ॅग्रो व्हिजन कृषी प्रदर्शनीच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कालच मी एका फाईलवर स्वाक्षरी केली. पंतप्रधान मोदींनी मला यासाठी विशेष प्रोत्साहन दिले. हा निर्णय असा आहे की, 15 वर्षे पूर्ण झालेल्या केंद्र सरकारच्या वा केंद्र सरकारच्या उपक्रमातील सर्व गाड्या यापुढे भंगारात काढाव्या लागतील. केंद्राच्या या धोरणाची अंमलबजावणी सर्व राज्य सरकारांनी करावी म्हणून हे धोरण सर्व राज्यांना पाठवले आहे. पंधरा वर्ष पूर्ण केलेले ट्रक, बसगाड्या, चारचाकी, दुचाकी राज्यांनीही भंगारात काढाव्या अशी अपेक्षा आहे. आता प्रत्येक ठिकाणी स्क्रॅपींग यूनिट सुरू होतील. त्यामुळे रोजगार निर्मितीही होईल आणि प्रदुषणही कमी होईल, असे गडकरी म्हणाले.

यापुढे फ्लेक्स इंजिनवर चालणारी वा इलेक्ट्रिक इंजिनवर चालणाऱ्या गाड्या खरेदी करा. येणाऱ्या काळात तंत्रज्ञानामुळे अनेक गोष्टी शक्य होणार आहे. पऱ्हाटीपासून तयार केलेल्या सीएनजीवर शेतकऱ्यांची वाहने चालतील. पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा. इथेनाॅलचे पंप टाकायचे आहे. ते टाकले की शेतकऱ्यांच्या मुलाची मोटरसायकल, गाड्या बायोइथेनाॅलवर चालेल.

विदर्भ पेट्रोल डिझेल मुक्त करायचा आहे. आजकाल गावात वीजेची मोठी समस्या आहे. कारण गावात खूप लोडशेडींग होते. हे लक्षात घेता शेतकऱ्यांनी साेलरपंप घ्यावे असे गडकरी यांनी सांगितले. सरकारी योजनेतून सोलरपंप मिळतात. यावर मोठी सवलत आहे.

यावेळी बोलताना शिवराजसिंग चौहान यांनी अ‍ॅग्रो व्हिजनमुळे शेतकऱ्यांचे जीवन बदलल्याचे सांगितले. नितीन गडकरी अशक्य गोष्टी शक्य करतात. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अनेक गोष्टी सहज शक्य झाल्या आहे. स्वत: पाहिल्या शिवाय लोक विश्वास ठेवीत नाही. गडकरींनी आयोजित केलेल्या प्रदर्शनात लोक अशा गोष्टी स्वत:पाहातात.

नितीन गडकरींनी अ‍ॅग्रो व्हिजन विदर्भापुरते मर्यादित न ठेवता मध्य प्रदेशातही आयोजित करावे. तिथे सरकार मदत करील. शेतकऱ्यांचे जीवन बदलण्याची ताकद या कृषी प्रदर्शनात आहे, असे चौहान म्हणाले. इथेनाॅलवर मध्य प्रदेश सरकार गांभीर्याने काम करीत असल्याची माहिती त्यांनी दिली. रेणुका देशकर यांनी सूत्रसंचालन केले. तर रमेेश मानकर यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...