आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशात द्राक्षे, केळी आणि हापूस आंब्याला बाजारपेठ मिळावी म्हणून केलेल्या प्रयत्नांना चांगले यश आले असले तरी विदर्भातील संत्रा उत्पादकांना मात्र अजूनही चांगली, विस्तृत बाजारपेठ आणि निर्यातीच्या दृष्टीने सुविधा मिळू शकलेल्या नाहीत. एकीकडे समृद्धी महामार्गाने नागपूर आता थेट मुंबईशी जोडले जात असताना संत्र्याला “समृद्धी’ मिळवून देण्यासाठी राज्यातील विदर्भ भागात प्रस्तावित तीन सायट्रस इस्टेट अजूनही कागदावरच आहेत. चार वर्षांपूर्वी याची घोषणा झाली, ४० काेटींची तरतूद करण्यात आली. परंतु, यात पुढे काहीच झालेले नाही.
विदर्भात दीड लाख हेक्टर क्षेत्र
देशात नऊ लाख हेक्टर तर विदर्भात सुमारे दीड लाख हेक्टरवर संत्री लागवड आहे.
विदर्भातील हे मुख्य फळपीक असताना पंजाबच्या तुलनेत महाराष्ट्राची संत्री उत्पादकता तब्बल
15 टन प्रति हेक्टरने कमी आहे.
सायट्रस इस्टेटमध्ये तंत्रज्ञानापासून मार्केटिंगपर्यंत कार्य अपेक्षित
राष्ट्रीय स्तरावरील लिंबूवर्गीय फळसंशोधन संस्था तसेच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात संशोधन केंद्र असताना या संस्था नवे वाण व उत्पादकता वाढीचे पूरक तंत्रज्ञान देण्यात अपयशी ठरल्या. परिणामी पंजाबच्या धर्तीवर तंत्रज्ञानापासून मार्केटिंगपर्यंत व्यवस्थापन करणाऱ्या सायट्रस इस्टेटची राज्य सरकारने घोषणा केली.
इथे नियोजित आहेत सायट्रस इस्टेट
विदर्भात मोर्शी तालुक्यातील उमरखेड, काटोल तालुक्यातील धिवरवाडी व वर्धा जिल्ह्यात आष्टी तालुक्यातील तळेगाव.
अमरावती, नागपूर व वर्धा जिल्ह्यातील संत्रा क्लस्टरही धूळ खात
अमरावती, नागपूर व वर्धा जिल्ह्यांचा संत्रा क्लस्टरमध्ये समावेश आहे. शेतकऱ्यांना निर्यातीसाठी प्रवृत्त करणे, तांत्रिक मार्गदर्शन, गुणवत्ता सुधारणे व निर्यातदारांशी लिकेंज अशी कामे अपेडा (कृषी व प्रक्रिया खाद्य उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण), पणन, मार्केटिंग बोर्ड व कृषी विभागाच्या समन्वयातून केली जातील. त्यासाठी राज्य सरकारने पूरक गावांची यादी करायची होती. यावर दोन-तीन बैठका, कार्यशाळा झाल्या. प्रायोगिक स्तरावर विमानाने दुबई, बहरीन, कतार, श्रीलंकेत तर कंटेनरने दुबईला संत्रा पाठवला. पुढे सारे ठप्प झाले.
आशा : समृद्धी महामार्गामुळे मुंबई बाजारात अधिक संधी
यंदा आंबिया बहार अतिवृष्टी, रोगामुळे वाया गेला. आता १५ जानेवारीपासून मृग बहार सुरू होईल. हा संत्रा आकार, चव आणि गुणवत्तेत अव्वल असतो. समृद्धी महामार्गामुळे मुंबईत कमी वेळेत संत्रा पोहोचू शकेल.
सायट्रस इस्टेट कागदावरून प्रत्यक्षात अवतराव्यात
^संत्र्याच्या शास्त्रोक्त व्यवस्थापनातूनच उत्पादकता वाढेल. द्राक्षामध्ये अनेक वाण आले, पण संत्र्याचे एकच वाण आहे. संशोधक संस्था नवे निर्यातक्षम संत्रा वाण देण्यात अपयशी ठरल्या. विदर्भातील संत्र्याला खऱ्या अर्थाने समृद्धी आणायची असेल तर कागदावरील सायट्रस इस्टेट प्रत्यक्षात अवतरायला हव्यात.'
- श्रीधर ठाकरे, कार्यकारी संचालक, महाऑरेंज, नागपूर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.