आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरणकुमार लिंबाळे यांची रोखठोक भूमिका:म्हणाले - दलितांवरील अन्यायासाठी संपूर्ण हिंदू समाजालाच दोषी ठरवणे हेही अन्यायकारक

नागपूर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतातील दलित आणि आदिवासींचे बहुसंख्य प्रश्न हे हिंदू समाजव्यवस्था, हिंदू धर्मव्यवस्था आणि हिंदू परंपरांशीच निगडित असून त्यांच्यात परिवर्तन होणे गरजेचे आहे. हे परिवर्तन घडवायचे असेल तर आम्हाला हिंदूंशी शत्रुत्व घेऊन चालणार नाही तर समन्वयातूनच हे सर्व प्रश्न सोडवून नवा समाज घडवता येईल, असे प्रतिपादन ख्यातनाम दलित मराठी साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांनी येथे बोलतांना केले. अखिल भारतीय साहित्य परिषदेतर्फे आयोजित साहित्यिक संवाद कार्यक्रमात ते बोलत होते.

स्थानिक अंध विद्यालयाच्या नवदृष्टी सभागृहात आयोजित या कार्यक्रमात साहित्यिक समीक्षक डॉ. राजेंद्र नाईकवाडे, डॉ. ईश्वर नंदपुरे आणि प्रकाश एदलाबादकर या तिघांनी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून लिंबाळे यांना बोलते केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अ. भा. साहित्य परिषद विदर्भ प्रांताचे अध्यक्ष आणि ख्यातनाम साहित्यिक अ‌ॅड. लखनसिंह कटरे हे होते.

यावेळी आपला मुद्दा विस्ताराने मांडतांना लिंबाळे म्हणाले की, दलित साहित्य हे अन्यायाविरुद्ध बोलणारे आहे, मात्र साहित्यातून सर्वच हिंदूंनी आपल्यावर अन्यायच केला ही भावना व्यक्त होणे, चुकीचे आहे. माणसाचे मन हे मन असते, तिथे जात किंवा धर्म आडवा येत नाही. हाच मुद्दा साहित्यातून मांडण्याचा मी प्रयत्न केला. प्रत्येक हिंदू माणसाला समोर ठेऊन समन्वयाची भूमिका साधण्यासाठी जातीधर्माच्या पुढे जात मी संवाद साधला. माझे साहित्य हे समाजपुरुषाशी साधलेला संवाद आहे, असे सांगून झालेल्या अन्यायासाठी संपूर्ण समाज जबाबदार नसतांनाही आम्ही समाजाला दोषी ठरवले आणि अकारण शत्रुत्व वाढवले अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

आम्ही अत्याचार करणारा गुन्हेगार समोर आणला तर बाकी सहृदय हिंदू आमच्या बाजूने देखील उभे होतील. मात्र आम्ही संपूर्ण हिंदू समाजालाच दोष दिला तर हिंदू समाजही आमच्या विरोधात एकवटेल आणि संघर्ष वाढतच राहिल, असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.

भारतातील कथित पुरोगामी मनुस्मृती पुन्हा आणली जात आहे, आणि देशाचे संविधान धोक्यात आले आहे, अशी ओरड करतात, याकडे लक्ष वेधले असता देशातील महिला आणि दलित तसेच आदिवासी तर जागृत झाले आहेतच, पण सनातनी हिंदू सुद्धा शिक्षणाच्या माध्यमातून खूप पुढे गेले असल्यामुळे आता मनुस्मृती आणली जाणार नाही, अशी ग्वाही लिंबाळे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिली.

भारतीय माणूस जिवंत आहे, तोपर्यंत संविधानाला धोका नाही असा दावाही त्यांनी यावेळी केला. काही राजकीय शक्ती संविधानाला धोका असल्याची अकारण ओरड करून त्याचे राजकारण करतात, अशी टीकाही त्यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...