आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजागतिक स्तरावर आणि भारतात 2010 पासून सतत वाढत चाललेले तापमान पाहता आणि ला निनो नंतर वाढत चाललेला अल निनोचा प्रभाव पाहता 2023 हे वर्ष सुद्धा उष्ण लहरी आणि अतिशय तापमान वाढीचे राहिल असा निष्कर्ष हवामान अभ्यासक आणि ग्रीन प्लानेट सोसायटीचे अध्यक्ष सुरेश चोपणे यांनी काढला आहे.
मागील 2022 वर्षी मार्च, एप्रिल, मे आणि जून महिन्यात अनेक उष्णतेच्या लाटा आल्या होत्या. मार्च 2022 मध्ये गुजरात, राजस्थानमध्ये 29, 30, 31 मार्च रोजीच उष्णतेच्या लाटा आल्या होत्या. एप्रिल महिन्यात सुद्धा 1, 2 तारखेला गुजरातमध्ये तर 26 ते 30 एप्रिल दरम्यान विदर्भात उष्णतेच्या लाटा आल्या.
तसेच 8 ते 15 मे आणि 3 ते 7 जून दरम्यान विदर्भात उष्णतेच्या लाटांचा प्रकोप पहावयास मिळाला होता. महाराष्ट्रातील अनेक शहरात तापमान 46 डिग्री पर्यन्त गेले होते तर चंद्रपूरमध्ये तापमान 46.8 पर्यंत गेले होते. अति तापमान आणि उष्णतेच्या लाटेंचे उन्हाळ्यात 30 दिवस होते. हा गेल्या 50 वर्षातील विक्रम आहे. वाढत चाललेली जंगलतोड, शहरीकरण, औद्योगिकरण, प्रदूषण आणि विशेषत: वातावरणातील कर्बवायूचे प्रमाण (420 पीपीएम) हे जागतिक पातळीवर तापमान आणि उष्णतेच्या लाटेला कारणीभूत आहेत.
ऐतिहासिक तापमान वाढ
1850 ते 1950 ह्या औद्योगिक काळाच्या पूर्वीचे तापमान पाहता इ. स. 2000 नंतरची आकडेवारी पाहिल्यास लक्षात येते की 2000 मध्ये तापमान 0.67 अंशाने वाढले होते. 2005 मध्ये ते 0.91 झाले. 2010 मध्ये 0.97 अंशाने तर 2014 मध्ये ते 1.0 डिग्रीने वाढले. 2014 नंतर प्रत्येक वर्षीचे तापमान 1 डिग्रीच्यावर गेलेले होते. गेल्या दोन दशकात सर्वाधिक तापमान वाढ ही 2016 मध्ये 1.28 डिग्रीने वाढले होते. (ह्याच वर्षी 19 मे रोजी राजस्थानमध्ये आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान ५१ डीसी नोंदवले गेले)
अल निनोचा प्रभाव
२०२० पासून २०२२ पर्यंत ला नीनाचा प्रभाव होता. त्यामुळे देशात चांगला पाऊस पडला. परंतु २०२३ च्या सुरवातीला सामान्य (न्युट्रल) स्थिती आली असून पुढे अल निनोचा प्रभाव वाढणार असल्याचे नासा, जागतिक हवामान विभाग आणि इतर हवामान संस्थानी अभ्यासाअंती जाहीर केले आहे. अल निनोच्या प्रभावामुळे उन्हाळ्यात तापमान वाढीस मदत मिळण्याची शक्यता आहे. असे झाले तर २०२३ हे वर्ष सुद्धा अत्यंत तापमानाचे वर्ष राहण्याची शक्यता आहे असे चोपणे यांनी म्हटले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.