आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदर्भात मुसळधार पाऊस:गडचिरोलीत पुरामुळे रस्ते बंद; अनेक भागात जनजीवन विस्कळीत, शेतकऱ्यांमध्ये चितेंचे वातावरण

नागपूर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन दिवस उसंत घेतलेल्या परतीच्या पावसाने नागपूरसह संपूर्ण विदर्भात पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली. नागपुरात सोमवारी पहाटेपासून तर इतर ठिकाणी रविवारपासूनच मुसळधार पावसाला सुरूवात झाली. मोसमी पावसाने विदर्भात पूरस्थिती निर्माण केल्यानंतर परतीचा पाऊस देखील त्याच मार्गावर आहे. जोरदार पावसानंतरही वातावरणातील उकाडा मात्र कमी झालेला नाही.

सोमवारपासून विजांच्या कडकडाटासह पावसाला पुन्हा एकदा सुरूवात झाली आहे. नागपूरसह यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, वाशीम या जिल्ह्यात संततधार सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्यात रविवारी वीज पडून तिघांचा मृत्यू झाला. तर वर्धा जिल्ह्यात देखील पूरस्थिती निर्माण झाली आहे. हा पाऊस असाच कायम राहिल्यास इतर जिल्ह्यात देखील अशीच परिस्थिती निर्माण होऊन गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे. या पावसामुळे पुन्हा एकदा जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकऱ्यांमध्येही चिंतेचे वातावरण आहे.

मुख्यालयाचा संपर्क तुटला

गडचिरोली जिल्ह्यात मागील 48 तासात झालेल्या अतिवृष्टीमुळे पर्लकोटा नदीला पूर आल्याने जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या भामरागड शहराचा जिल्हा मुख्यालयापासून पुन्हा एकदा संपर्क तुटला आहे. संपूर्ण जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली असून 8 मार्ग बंद झाले आहेत. गडचिरोली-गुरवाळा, माडेमुल-रनमुल,चांदाळा-कुंभी,धानोरा-सोडे, पेंढरी-पाखांजुर, साखरा-कारवाफा, लाहेरी-बिनागुंडा, आलापल्ली-ताडगांव-भामरागड हे मार्ग बंद झाले आहे.

नागरिकांना स्थलांतर

कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यभर अतिवृष्टी होत असल्याने पूरस्थिती निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे. गडचिरोली जिल्ह्यात देखील रविवारपासून सतत मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे गोदावरी, प्राणहिता आणि पर्लकोटा ह्या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. पर्लकोटा नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्याने भामरागडशी संपर्क तुटला आहे. दुसरीकडे मेडीगड्डा धरणाचे ७० दरवाजे खुले करण्यात आल्याने सिरोंचा तालुक्यातील नदीकाठावरील गावात पाणी शिरण्यास सुरवात झाली आहे. असाच पाऊस कोसळत राहिल्यास या भागातील काही गावांतील नागरिकांचे स्थलांतर करावे लागेल. भंडारा जिल्ह्यातही मुसळधार पावसामुळे पाऊळदवणा ते बेला मार्ग तसेच लाखांदुरकडे जाणारा मार्ग बंद झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...