आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंडे पॉझिटिव्ह:साडेतीन हजार हायवे मृत्युंजय दूतांनी शेकडो जखमींना वाचवले, 1 मार्च रोजी योजनेची सुरुवात

नागपूर / अतुल पेठकरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

हायवेवर किंवा अन्यत्र कुठे अपघात झाला की लोक पोलिसांचा ससेमिरा नको म्हणून मदतीसाठी पुढे येत नाहीत. या स्थितीत अपघातातील जखमींना वेळेवर मदत मिळावी यासाठी १ मार्च २०२१ रोजी राज्यात “हायवे मृत्युंजय दूत’ योजना सुरू करण्यात आली. १ ते १५ मार्च या कालावधीत ठाणे, पुणे, रायगड व नागपूर परिक्षेत्रात झालेल्या २५ अपघातांत या हायवे मृत्युंजय दूतांनी शेकडो जखमींचे प्राण वाचवल्याची माहिती महामार्ग पोलिसांचे अतिरिक्त पोलिस महासंचालक व नागपूरचे माजी पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी दिली.

असे आहेत मृत्युंजय दूत
ठाणे परिक्षेत्रात २५१, पुणे परिक्षेत्रात २७१३, रायगडमध्ये ४५१ व नागपूर परिक्षेत्रात २८० असे एकूण ३६९५ मृत्युंजय दूत कार्यरत आहेत. १ ते १५ मार्च या कालावधीत ठाणे परिक्षेत्रात अपघाताच्या ११, पुणे परिक्षेत्रात १३, तर नागपूर परिक्षेत्रात १ घटना घडली. या घटनांमध्ये मृत्युंजय दूतांनी शेकडो जखमींचे प्राण वाचवले. “हायवे मृत्युंजय दूत’ ही डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांची संकल्पना आहे. अपघातातील जखमींना पहिल्या तास दीड तासात म्हणजे “गोल्डन अवर’मध्ये तातडीने योग्य उपचार मिळून त्यांचा जीव वाचावा हा यामागे उद्देश असून महामार्गावर नेहमी कार्यरत असलेले सामान्य नागरिक यांना “मृत्युंजय दूत’ म्हणून सहभागी केले आहे. या योजनेत जास्तीत जास्त नागरिकांनी “मृत्युंजय दूत’ म्हणून नावे नोंदवून सहकार्य करण्याचे आवाहन उपाध्याय यांनी केले आहे.

निवड झाल्यानंतर दिले जाते प्रथमोपचाराचे प्रशिक्षण
हायवेलगत अनेक पानठेलेवाले, ढाबेवाले, टायर रिमोल्डिंग तसेच लहान- मोठे व्यवसाय करणारे असतात. अपघात सर्वप्रथम हे पाहतात. त्यांनाच “मृत्युंजय दूत’ होण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे. निवड झाल्यानंतर त्यांना रीतसर प्रथमोपचाराचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यांना स्ट्रेचर तसेच प्रथमोपचार पेटी दिली जाईल. अशा चार पाच “मृत्युंजय दूत’ यांचा एक गट तयार करून त्यांच्याकडे संबंधित केंद्रापासूनच्या किमान पाच-सहा गावांची जबाबदारी देण्यात येईल. त्यांना पोलिस िवभागाकडून “मृत्युंजय दूत’ असे ओळखपत्रही दिले आहे, अशी माहिती उपाध्याय यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...