आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी मुलाखत:बजरंग दलावरील बंदीचे प्रयत्न हिंदू समाजच उधळून लावेल : मिलिंद परांडे, विहिंपचे राष्ट्रीय महामंत्री

नागपूर, अतुल पेठकर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात काँग्रेसने सत्तेवर आल्यास बजरंग दल, पीएफआयवर बंदी घालण्याचे आश्वासन दिले आहे. याविषयी तसेच आगामी निवडणुकांबद्दल विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी दिव्य मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांची मते मांडली.

विहिंप दिलेले वचन पूर्ण करणारी संघटना आहे, असे तुम्ही म्हटले आहे. राम मंदिर पूर्ण झाले. आता काशी-मथुरा कधी पूर्ण होणार?
मिलिंद परांडे :
अयोध्येतच आणि भव्य राम मंदिर बांधू असे वचन विहिंपने दिले होते. विहिंपने ते पूर्ण केले. आता लवकरच काशी आणि मथुरेचीही वचनपूर्ती समाज करील. राम मंदिराच्या आंदोलनात संपूर्ण हिंदू समाज उतरला होता. विहिंपने त्या आंदोलनाचे नेतृत्व केले होते. काशी आणि मथुरेच्या बाबतीतही विहिंप संघटनेचे सामर्थ्य हिंदू समाजाच्या मागे उभे करील.

कर्नाटक, छत्तीसगड सरकारने बजरंग दलावर बंदीची भाषा का केली आहे?
मिलिंद परांडे
: निवडणुका जवळ येतील तसतसे हिंदू संघटनांना टार्गेट केले जाईल. आता काँग्रेस तेच करीत आहे.

विहिंप अचानक अॅक्शन मोडवर का?
मिलिंद परांडे :
केवळ मुस्लिम लांगूलचालनासाठी पीएफआयसारख्या अराष्ट्रीय व दहशतवादी संघटनेशी बजरंग दलासारख्या संघटनेची तुलना होत आहे. अशा वेळी विहिंपने हातावर हात देऊन शांत बसावे काय? हिंदू समाज विहिंपची ताकद आहे. हा समाजच बजरंग दलावरील बंदीचे प्रयत्न उधळून लावेल.

पण विहिंप काय करणार आहे?
मिलिंद परांडे
: पीएफआयसारख्या अराष्ट्रीय व दहशतवादी संघटनेशी बजरंग दलाची तुलना करणे चुकीचे आहे. काँग्रेसने आधीे राम मंदिराला आणि आता बजरंग दलाला विरोध केला आहे. आम्ही याविरोधात हिंदू समाजात जाऊन जनजागृती करू.

२०२४ च्या निवडणुकीसाठी विहिंपची काय तयारी आहे?
मिलिंद परांडे
: विश्व हिंदू परिषदेचा दैनंदिन राजकारणात थेट सहभाग कधीच नसला तरी केंद्रात आणि सर्व राज्यात हिंदू हिताला जपणारे सत्तेत यावे, देशाची आणि राज्यांची धुरा याेग्य लोकांच्या हातात राहावी यासाठी सुमारे ७२ लाख हितचिंतक देशव्यापी जनजागरण मोहीम हाती घेणार आहोत.

जनजागरण म्हणजे नक्की काय करणार?
मिलिंद परांडे
: हिंदू हिताचे रक्षण करणारी सरकारे केंद्रात आणि राज्यात असायला हवी यासाठी लोकांमध्ये जाऊन त्यांना वस्तुस्थिती समजावून सांगू. देश आणि समाजासमोरील आव्हाने आणि त्यावर मात कशी करता येईल हे लोकांना वारंवार सांगणे आवश्यकच आहे.

ग्रामीण, आदिवासी भागांच्या तुलनेत शहरी भागात मतदान खूप कमी होते. यावर काय उपाय करणार आहात?
मिलिंद परांडे
: तुम्ही म्हणता ते खरे आहे. हिंदू हिताची सरकारे येण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने घराबाहेर पडून मतदान केले पाहिजे. म्हणून लोकांशी संपर्क साधून त्यांना मतदानासाठी प्रेरित करण्याचे काम विहिंप करणार आहे. प्रत्येकच ठिकाणी प्रत्यक्ष जाणे शक्य नसल्यास त्यासाठी प्रसंगी डिजिटल माध्यमांचा उपयोग करता येईल काय याचाही विचार करू. याशिवाय अन्य काही मार्ग समोर आले तर त्यांचाही वापर करून लोकांना मतदानाचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे.

हितचिंतकांमार्फत देशव्यापी जनजागरण करण्यात येईल असे तुम्ही म्हणालात. देशभरात नेमके किती हितचिंतक आहेत?
मिलिंद परांडे :
विश्व हिंदू परिषदेने ६ नोव्हेंबर २०२२ पासून संपूर्ण देशात हितचिंतक म्हणजेच सदस्यता मोहीम हाती घेतली होती. २० नोव्हेंबरपर्यत संपूर्ण भारतात दीड लाख गावात संपर्क साधून एक कोटी हिंतचिंतक जोडण्यात येणार होते. त्यापैकी सुमारे ७२ लाख हितचिंतक जोडले आहे. हे सारे आमच्या नियोजनबद्ध जनजागरणातूनच शक्य झाले आहे.

यामध्ये महिला किती आहेत?
मिलिंद परांडे :
३४ लाखांहून अधिक युवक बजरंग दलाशी जोडले गेले. १६ लाखांहून अधिक महिला हितचिंतक झाल्या. महाराष्ट्रात ७ लाख, मध्य प्रदेशात ९ लाख, यूपी ९ लाख, दक्षिणेत एक ते दीड लाख हितचिंतक आहेत.