आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानागपुरातील ऐतिहासिक बर्डीचा किल्ला रविवारी (19 जून) नागरिकांसाठी सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत खुला करण्यात येणार आहे. एरव्ही वर्षातून फक्त तीनदा 26 जानेवारी, 15 ऑगस्ट व 1 मे रोजी याचा काही भाग जनतेसाठी खुला करण्यात येतो. यावर्षी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 19 जून रोजीही किल्ला पाहाता येणार आहे.
या किल्ल्यावर तोफखाना व दारुगोळा असायचा. या किल्ल्यावर तेव्हा अरब सेनेने हल्ला चढविल्याची नोंद आहे. हा किल्ला नंतर लष्कराच्या ताब्यात देण्यात आला. ब्रिटिश-मराठ्यांच्या युद्धाचे प्रतीक असलेला शहरातील सीताबर्डी किल्ला सध्या भारतीय लष्कराच्या ताब्यात असून पर्यटकांच्या दृष्टीने तो आकर्षणाचे केंद्र ठरला आहे. मात्र, सुरक्षितेच्या कारणाने तो केवळ राष्ट्रीय सणाच्या दिवशीच उघडण्यात येतो.
एकेकाळी ओसाड आणि दगडांच्या टेकड्यांचा हा परिसर यदुवंशीयामुळे प्रकाशझोतात आला. येथे लहान टेकडी आणि मोठी टेकडी होती. या टेकड्यांना दोन यदुवंशी बंधू शीतलाप्रसाद आणि बद्रीप्रसाद गवळी यांच्या नावावरून सीताबर्डी असे नाव पडल्याचे सांगण्यात येते. भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत या किल्ल्यावर ब्रिटिश लष्करी छावणीचा ‘युनियन जॅक’ फडकत होता. देश सोडल्यानंतर त्यांनी हा किल्ला लष्कराकडे सोपवला.
870 एकरवर वसलेला सीताबर्डी किल्ला इंग्रज विरुद्ध भोसले यांच्यातील युद्धाचे प्रतीक आहे. सीताबर्डीवर नागपूरचे राज्यकर्ते आप्पासाहेब ऊर्फ मुधोजी द्वितीय यांनी ईस्ट इंडिया कंपनी विरोधात लढा दिला. अप्पासाहेब भोसले आणि ब्रिटिशांमध्ये नोव्हेंबर 1817 मध्ये लढाई झाली. इंग्रजांनी सीताबर्डी परिसरातील दोन महत्त्वाच्या टेकड्या ताब्यात घेतल्या. ब्रिटिशांनी या दोन टेकड्यांचे किल्ल्यांमध्ये रूपांतर केले. या किल्ल्याचे बांधकाम काळ्या दगडाने केले आहे. येथे तोफखाना व दारूगोळा ठेवला जात असे. किल्ल्यावर अरब सेनेने हल्ला चढवल्याची नोंद आहे. मोठी टेकडी ‘किल्ला’ म्हणून ओळखली जाते तर लहान टेकडीवर गणपतीचे मंदिर आहे.
टिपू सुलतानच्या नातवाला फाशी
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना या किल्ल्यावरील तुरुंगात 10 एप्रिल ते 15 मे 1923 या काळात ठेवण्यात आले होते. ती कोठडी अजूनही तशीच आहे. शिवाय इंग्रजांनी 1857च्या क्रांतीमध्ये सहभागी टिपू सुलतान यांचे नातू नवाब कादर अली व त्यांच्या 8 सहकाऱ्यांना येथे फाशी दिली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.