दिव्य मराठी विशेष : नागपूरमध्ये लाॅकडाऊनमध्येही प्रवाहित झाली माणुसकी

  • रेल्वे प्रशासनाने स्थानकावरून बाहेर काढलेल्या 28 वयोवृद्ध प्रवाशांना नागपूरकरांनी दिला मदतीचा हात

दिव्य मराठी

Mar 24,2020 08:26:00 AM IST

अतुल पेठकर


नागपूर : रामेश्वरमच्या यात्रेवरून मिर्झापूर, उत्तर प्रदेशला जाणाऱ्या २८ वयोवृद्ध प्रवाशांना नागपूर रेल्वे प्रशासनाने स्थानकाबाहेर काढून दिले. मात्र, लाॅकडाऊनमध्येही नागपूरकरांनी सोशल मीडियातून माहिती होताच त्यांच्या प्रवासापासून जेवण्यापर्यंत सर्व व्यवस्था केली. नागपूरकरांच्या या आतिथ्याने उत्तर प्रदेशातील हे वयोवृद्ध प्रवासी भारावून गेले आणि नागपूरकरांना धन्यवाद देत पुढील प्रवासासाठी रवाना झाले.


एक प्रवासी चंद्रदत्त त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार मिर्झापूर येथील ८० भाविक १२ मार्चला अलाहाबाद येथून रामेश्वरम यात्रेसाठी निघाले. कोलकाता, जगन्नाथ पुरी, श्रीशैल्यम, बालाजी असे दर्शन करत ते २१ तारखेला रामेश्वरम येथे पोहोचले. २१ ला पंतप्रधानांनी रविवार २२ ला जनता कर्फ्यू पालन करण्याचे आवाहन केले. त्यामुळे रामेश्वरम येथील धर्मशाळेने या प्रवाशांना तिथून निघून जाण्यास सांगितले. नागपूर येथून मिर्झापूरला जाण्यासाठी एर्नाकुलम-पटना एक्स्प्रेस असल्याने ते २१ तारखेला मदुराई-निझामुद्दीन एक्स्प्रेसने नागपुूरसाठी निघाले व २१ च्या मध्यरात्री नागपूर रेल्वेस्थानकावर पोहोचले.


सकाळी एर्नाकुलम-पटना एक्स्प्रेसमध्ये प्रचंड गर्दी असल्याने आतील प्रवाशांनी त्यांना विरोध केलाी. त्यातही ५२ प्रवासी चढण्यात यशस्वी झाले, तर वयोवृद्ध २८ प्रवासी स्थानकावरच राहिले. सोमवारी सकाळी रेल्वे प्रशासनाने त्यांना “ट्रेन सुरू होईल तेव्हा या’ असे म्हणत स्थानकाबाहेर काढले. हे प्रवासी उपाशी स्थानकाबाहेर बसून होते. याची माहिती फेसबुक व व्हाॅट्सअॅपवर प्रसारित होताच अनेक स्वयंसेवी संस्थांनी मदतीसाठी धाव घेतली. या प्रवाशांची व्यवस्था महाल विभागातील टाटा पारसी गर्ल्स हायस्कूलमध्ये करण्यात आली. त्यानंतर अनेकांनी पोळ्या-भाजी घेऊन नेऊन दिली.


रेल्वे प्रशासनाची सारवासारव


नागपूर रेल्वेचे सहायक वाणिज्य व्यवस्थापक एस. जे. राव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. हे प्रवासी स्थानिक नातेवाइकांकडे आले होते. त्यामुळे त्यांना आम्ही त्यांच्याकडे जाण्यास सांगितले, असे राव यांनी सांगितले. रेल्वेस्थानकावर आलेल्या प्रवाशांना घरी सोडून देण्यास तीन गाड्या नेहमी उभ्या असतात, अशी मखलाशीही राव यांनी केली. हे प्रवासी बाहेरगावहून आले होते, हे मानण्यास राव तयार नव्हते.

X