आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मला चंद्रावर कथ्थक नृत्य करायचे:सुप्रसिद्ध नृत्यगुरू शमा भाटे यांनी मुलाखतीतून व्‍यक्‍त केली भन्‍नाट ईच्‍छा

नागपूर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कथक नृत्‍य आता देशविदेशात सर्वत्र केले जाते. पण एखादा कथ्थकचा ग्रुप चंद्रावर किंवा मंगळावर जावा, अशी माझी ईच्‍छा आहे. ति‍थे केले गेलेले नृत्‍य कसे दिसेल, काय अडचणी येतील असे अनेक प्रश्‍न मला पडतात. भविष्‍यात माझे विद्यार्थी चंद्रावर जावेत, अशी भन्‍नाट ईच्‍छा सुप्रसिद्ध उत्‍कृष्‍ट कलाकार, गुरू, नृत्‍यदिग्‍दर्शक, संचालक शमा भाटे यांनी व्‍यक्‍त केली. कलाश्री आर्ट फाऊंडेशनच्‍यावतीने सोमवारी त्यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी चंद्रावर कथ्थक नृत्य सादर करण्याची ईच्छा व्यक्त केली.

हिंदुस्तान कॉलनीस्थित सिटी प्रिमियर कॉलेजच्या सभागृहात झालेल्‍या या कार्यक्रमात मुलाखतकार रेणुका देशकर यांनी ‘भविष्‍यात तुमची काय करायची ईच्‍छा आहे’, या विचारलेल्‍या प्रश्‍नाला शमा भाटे यांनी असे दिलखुलास उत्‍तर दिले. कथ्थक नृत्‍यात असलेल्या क्षमतेच्या मानाने त्‍याचे महत्‍त्‍व आणि प्रसार आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर झालेला नाही, अशी खंत भाटे यांनी व्‍यक्‍त केली. कथ्थक नृत्‍याला आंतरराष्‍ट्रीय ख्‍यातीचे सतारवादक रव‍िशंकर यांच्‍यासारख्‍या महनीय व्‍यक्‍तीचा पाठिंबा मिळाला तर जगभरात कथ्थकचे घुंगरू निनादतील, असा आशावाद त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

आपले वैयक्तिक आयुष्‍य उलगडताना शमा भाटे यांनी गुरू व सासू रोहिणी भाटे यांचा प्रेरणास्‍थान व रोल मॉडेल असा उल्‍लेख केला. कला ही स्‍वत्‍व शोधण्‍याचे माध्‍यम असून सूर आणि लय या अमूर्त कलांच्‍या आधारे माणसाची उन्‍नती होत जाते. दर दिवशी चांगला माणूस होण्‍याचा एक सुंदर मार्ग कला दाखवते, असे त्‍या म्‍हणाल्‍या. कलेला प्रसन्‍न करण्‍यासाठी तिच्‍यावर प्रेम केले पाहिजे, नित्‍यनेमाने रियाज केला पाहिजे. मन, बुद्धी आणि शरीराने रियाज केला तरच कला प्रसन्‍न होते, असे त्‍या म्‍हणाल्‍या. कलेची प्रेरणा विद्यार्थ्‍यांना मोहात अडकू देत नाही. कलाकाराने केवळ व्‍यावसायिक होऊ नये तर नीतीमत्‍ता, आचरण आणि अध्‍यात्‍माची जोड त्‍याला द्यावी, असे त्या म्हणाल्या.

शमा भाटे यांच्‍या शिष्‍या अमीरा पाटणकर यांनी सुरुवातीला गणेशवंदना व नंतर ‘हिंडिंबा’ ही शमा भाटे यांनी दिग्‍दर्शित केलेली नृत्‍यनाटिका सादर केली. यावेळी गुरू शमा भाटे, गुरू ललिता हरदास, अमीरा पाटणकर यांचा सत्‍कार करण्‍यात आला. कलाश्रीच्या सचिव डॉ. भाग्यलक्ष्मी देशकर यांनी प्रास्‍ताविक करताना कलाश्रीच्‍या कार्याचा आढावा घेतला. डॉ. भाग्‍यलक्ष्‍मी देशकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाला श्रीमथी माडखोलकर, नृत्यगंधच्या निहारिका जयदेव, कलाश्री नागपूर शाखेच्या सदस्य पूजा मुळे, सुरेखा देशपांडे यांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...