आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे. 15 वर्षे सत्तेत असलेल्या भाजप कार्यकर्त्यांनीही पाण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागले, इतका हा प्रश्न गंभीर झाला आहे. अशात आम आदमी पार्टीला नागपुरातील जनतेने साथ दिल्यास व पक्ष महापालिकेत सत्तेत आल्यास प्रत्येक घराला दरमहा 15 हजार लिटर पाणी मोफत देण्याची घोषणा पक्षाचे महाराष्ट्र राज्य संयोजक रंगा राचुरे यांनी केली. नागपुरात संविधान चौकात झालेल्या सभेनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरीदेखील ओसीडब्ल्यूच्या कामकाजाबद्दल असमाधानी आहेत. ते कंपनी काढून टाकण्याबद्दल बोलले आहे. मात्र त्यानंतही याकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल राचुरे यांनी आश्चर्य व्यक्त केले.
नागपुरात 24 बाय 7 या नावाने ओसीडब्ल्यू या कंपनीला शहरात 2012 मध्ये पाच वर्षांसाठी कंत्राट देण्यात आले होते. ही कंपनी आल्यानंतर परिस्थिती सुधारण्याऐवजी समस्या अधिकच गंभीर झाली. शहराच्या सुमारे निम्म्या लोकसंख्येला टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. ओसीडब्ल्यू कंपनी खोटे दावे करते आणि अधिकारी व नेत्यांच्या संगनमताने मनपाच्या वार्षिक 150-160 कोटी रुपयांच्या तिजोरीची लूट करीत आहे.
एका आरटीआयनुसार, ओसीडब्ल्यू दररोज 650 एमएलडी पाणी स्वच्छ करते आणि ते शहराला पाठवते, परंतु 380 एमएलडी पाण्याचा हिशोब फक्त दिला जाऊ शकतो. त्यामुळे उर्वरित 170 एमएलडी पाणी कुठे जात आहे, त्याचा हिशेब ठेवायला कुणीच नाही, असे ते म्हणाले. नागपूरची लोकसंख्या सुमारे 30 लाख आहे. एका व्यक्तीला रोज सरासरी दीडशे लिटर पाणी लागते. त्यानुसार नागपूरच्या जनतेला त्याच्या गरजेनुसार केवळ 450 एमएलडी पाणी देऊन प्रत्येकाला भरपूर पाणी मिळायला हवे होते. पण क्षमतेच्या दुप्पट असूनही अडचण का होते, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.
उपलब्ध डाटानुसार पाणी स्वच्छ करण्याची क्षमता 975 एमएलडी आहे. त्यातून 80 लाख लोकांना मुबलक पाणी उपलब्ध होऊ शकते. या कंपनीच्या दाव्यानुसार 655 एमएलडी पाणी पुरवठा करून 60 लाख लोकांना मुबलक पाणी मिळायला हवे होते, प्रत्यक्षात जनतेला गरजेपेक्षा कितीतरी कमी पाणी दिले जात आहे. "ओसीडब्ल्यू'ला काम दिल्यानंतरही गेल्या 10 वर्षांत 171 कोटी रुपये पालिकेने टँकरला दिले आहेत. पाण्याच्या नावाखाली नेते व अधिकाऱ्यांनी पैशांची लूट केली असून, भरमसाठ कर भरूनही जनता पाण्यासाठी आजही त्रस्त आहे, हे यातून स्पष्ट होत असल्याचे राचूरे म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.